MaharshtraPoliticalUpdate : महाविकास आघाडीपेक्षाही काँग्रेसची मोठी नामूष्की …!!

पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडी आणि काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीतील केवळ दोन नेत्यांनी या निकालाला गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहेत त्यापैकी एक म्हणजे स्वतः मुख्यमंत्री आणि दुसरे काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात !! बाकी शीर्ष आणि जबाबदार नेत्यांना ना खेद ना खंत ….असेच चित्र दिसले. दरम्यान संजय निरुपम यांनी पक्षांतर्गत गटबाजीतून हंडोरे यांचा पराभव झाला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता काँग्रेसच्या सर्व आमदारांना मंगळवारी रात्रीपर्यंत दिल्ली येथे तातडीने बोलाविण्यात आले आहे. बुधवारी या सर्व आमदारांची बैठक होणार असल्याचे वृत्त आहे.
काँग्रेसचे सेफ उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाची बातमी येताच यावर आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले कि , आमच्या आमदारांचीच काही मते आम्हाला मिळाली नाहीत, हे मान्य करावे लागेल. माझी भावना पक्षश्रेष्ठींना कळविणार आहे. या स्थितीत महाविकास आघाडी म्हणूनदेखील विचार करावा लागणार आहे. सरकारला अडीच वर्षे झाली आहे. त्यामुळे सरकार म्हणून आम्हाला विचार करावा लागणार आहे.
मते फुटली याची सर्व जबाबदारी आम्हा सर्वांची : थोरात
दरम्यान या निकालामुळे नाराज झालेले महसूलमंत्री थोरात हे राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. बाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री आणि काॅंग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत. कॉंग्रेसची मते फुटल्याचे मान्य करत स्वत: बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘ मते फुटली याची सर्व जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. यावर आम्ही निश्चितपणे विचार करू. पक्ष म्हणून आमचा दोष आहे. इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. मात्र, महाविकास आघाडी म्हणून विचार करण्याची गरज आहे. सरकार म्हणूनदेखील यावर विचार करण्याची गरज आहे.’’
कॉंग्रेसची स्वत:ची ४४ मते असताना कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे व भाई जगताप यांना अनुक्रमे २२ व १९ मते मिळाली. विशेष म्हणजे पहिल्या पसंती क्रमात हंडोरे यांना २६ मतेदेखील मिळविता आली नाहीत. परिणामी दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांमध्ये कॉंग्रेसचे भाई जगताप विजयी झाले तर हंडोरे यांना पराभव पत्करावा लागला आणि भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड विजयी झाले.
पक्षांतर्गत गटबाजीने हंडोरे यांना पाडले : संजय निरुपम
या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने सलग दुसऱ्यांदा महाविकास आघाडीचा पराभव केला असला तरी या निकालानंतर काॅंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. हंडोरे यांना पक्षांतर्गत गटबाजीमुळे पाडल्याचा आरोप माजी खासदार संजय निरूपम यांनी केला. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे निकालाआधीच नागपूरला निघून गेले. तेव्हाच काॅंग्रेस धोक्यात असल्याची चर्चा होती.
विशेष म्हणजे या निकालात सर्वाधिक नुकसान कॉंग्रेसचे झाले असून पक्षाची मते फुटल्याने याचा परिणाम राज्य सरकार परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेसच्या उमेदवाराला पहिल्या फेरीतला कोटादेखील पूर्ण करता न आल्याने कॉंग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे. पक्षात गटबाजी नाही. आम्ही सारे एकत्र आहोत. मात्र, नेकमे काय झाले. मते कशी फुटली याचा विचार करावा लागेल, असे थोरात यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया
विधान परिषदेचा निकाल पाहता काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांना मतांचा कोटा ठरवून दिला असताना प्रत्यक्षात मिळालेल्या मतांमध्ये फरक दिसला. काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडली. हा निश्चितच गंभीर विषय आहे. याबद्दल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. हायकमांडला कळविले जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.