AurangabadCrimeUpdate : वेडसर महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक

औरंगाबाद : वासनेची भूक भागविण्यासाठी अत्यंत खालच्या थराला जाऊन वेडसर महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास शिऊर पोलिसांनी अवघ्या दोनच तासात गजाआड केले. घटनास्थळी सापडलेला बूट आणि अन्य काही पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. प्रेमसिंग मन्साराम मेवाळ (रा. तरट्याची वाडी, ता. वैजापूर) असे या नराधम संशयिताचे नाव असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिऊर बंगला, ता वैजापूर (मूळ राहणार खिर्डी) येथील येथील एका महिलेने सोमवार सकाळी पोलिस ठाणे गाठून यासंदर्भात केली होती. तिच्या वेडसर बहिणीवर रविवारी (दि. १९) रोजी सायंकाळी ६ ते सोमवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान शिऊर बंगला ते शिऊर रोडवर हॉटेल साई पंढरीच्या जवळ नवीन मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याचे या महिलेने फिर्यादीत म्हटले होते. यावेळी तिच्या बहिणीला मारहाणही झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
त्यानुसार शिऊर पोलिसांनी तातडीने गुन्ह्याची नोंद केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी उपनिरीक्षक नागटिळक यांच्याकडे सोपविण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी महिला पोलिस अंमलदाराच्या मदतीने वेडसर पीडित महिलेला धीर देत धीर देत तिची विचारपूस केली. तसेच आरोपाचे तुरळक वर्णन तिच्याकडून जाणून घेतले.
घटनास्थळी आढळलेल्या बुटावरून लागला तपास
यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यावर त्यांना त्या ठिकाणी पुरुषाच्या बुटाचा जोड आणि अन्य काही पुरावे हाती लागले. त्यानुसार तपासाला गती देत पोलिसांची दोन वेगवेगळी पथके आरोपीच्या शोधात रवाना झाली. पोलिसांनी हार न मानता त्रोटक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करीत प्रेमसिंग मन्साराम मेवाळ याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याला पायातील बुटांबाबत माहिती विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे देणे सुरु केले. त्यावरून पोलिसांचा संशय वाढत गेला. शिवाय पीडितेने दिलेल्या तुरळक माहितीची पडताळणी केल्यावर प्रेमसिंग मेवाळ हाच खरा आरोपी असल्याची खात्री पोलिसांना पटली. त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यास मोठ्या शिताफीने पकडून पोलिस ठाण्यात आणले.
तपासादरम्यान घटनास्थळी सापडलेल्या बुटाचा जोड मेवाळ याचाच असल्याची खात्री डॉग स्कॉडच्या माध्यमातून करण्यात आली. त्यानुसार पंचनामा करण्यात आला. अखेर प्रेमसिंगला पोलिस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याविरोधात शिऊर पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६ व ३२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.