AurangabadNewsUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शाब्दिक तोफ आज औरंगाबादेत धडाडणार …

औरंगाबाद : मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखेच्या वर्धापनदिनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होत आहे. ८ जून १९८५ मध्ये शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा स्थापन झाली होती. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या या सभेसाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. आज संध्याकाळी सहा वाजता औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हि सभा होणार आहे.
महानायक ऑनलाईन च्या युट्युब चॅनलवर हि जाहीर सभा लाईव्ह पाहता येईल…
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी उभारण्यात आलेल्या स्टेजवर संभाजी महाराजांचा भव्य पुतळा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या सभेत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादच्या नामांतराची घोषणा करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या नामांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. नामांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर औरंगाबादला संभाजीनगर तर उस्मानाबादला धाराशिव अशी ओळख दिली जाईल, अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपने औरंगाबादच्या राजकारणाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच भाजपने काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरात पाणी प्रश्नावरून जल आक्रोश मोर्चा काढला होता. दरम्यान यानिमित्ताने भाजपनेही औरंगाबाद शहरात पोस्टरबाजी केली आहे. शहरात ज्या ठिकाणी मुख्यमंत्री ठाकरेंच्या सभेच्या मोठमोठे पोस्टर लागले आहे. त्याच परिसरात भाजपने पोस्टर लावले आहेत.