Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : भाजपने राज्यसभा निवडणुकीतील आपले दोन पत्ते उघडले…

Spread the love

मुंबई : राज्यसभेच्या ६ जागांसाठी शिवसेनेने आपले दोन उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजपनेही दोन जणांची नावे  जाहीर केली आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना अपेक्षेप्रमाणे पुन्हा संधी देण्यात आली आहे तर दुसऱ्या जागेवर माजी मंत्री अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावेही उद्या उघड होतील असे सांगण्यात येत आहे. दरम्यान सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 


डॉ. अनिल बोंडे ओबीसी समाजातील भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. बोंडे दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. २००९ मध्ये ते अपक्ष म्हणून विधानसभेत आले होते  त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मोर्शी मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. फडणवीस सरकारमध्ये ते कृषी मंत्री होते. २०१९ च्या निवडणुकीत मात्र स्वाभिमानी पक्षाच्या देवेंद्र भुयार यांनी बोंडे यांचा पराभव केला होता.

देशातल्या १५ राज्यातील ५७ जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. ५७ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ २१ जून ते १ ऑगस्ट यादरम्यान संपत आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या भाजपच्या तीन नेत्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामध्ये पियूष गोयल, विकास महात्मे आणि विनय सहस्रबुद्धेंचा समावेश आहे. पैकी गोयल यांना पक्षानं पुन्हा संधी दिली आहे.

अशी आहेत देशभरातील उमेदवारांची नावे

दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणा या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मध्य प्रदेशातून कविता पाटीदार यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. निर्मला सीतारामन आणि जगेश यांना कर्नाटकमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पियुष गोयल आणि अनिल सुखदेवराव बोंडे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली आहे. राजस्थानमधून घनश्याम तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पक्षाने सुरेंद्र सिंह नागर, बाबुराम निषाद, दर्शना सिंह आणि संगीता यादव यांना उमेदवारी दिली आहे.

यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे …

कार्यकाल संपत असलेल्या नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेस नेते जयराम रमेश, कपिल सिब्बल यांचा कार्यकाळही संपत आहे. त्याचबरोबर बसपचे सतीश चंद्र मिश्रा यांचा कार्यकाळही संपत आहे. पंजाबमधील एकमेव अकाली दलाचे राज्यसभा सदस्य बलविंदर सिंग भूंदर आणि काँग्रेसच्या अंबिका सोनी यांचाही कार्यकाळ संपणार आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशातील 11 राज्यसभा खासदार जुलैमध्ये निवृत्त होत आहेत. या खासदारांमध्ये भाजपचे ५, समाजवादी पक्षाचे ३, बसपाचे २ आणि काँग्रेसचा १ सदस्य आहे. तसेच बिहारमधून ५ राज्यसभा सदस्य जुलै महिन्यात निवृत्त होणार आहेत. ज्यामध्ये आरजेडीच्या मीसा भारती, भाजप नेते सतीश चंद दुबे आणि गोपाल नारायण सिंह यांचा समावेश आहे. तर जेडीयूचे रामचंद्र मिश्र यांचा समावेश आहे. याशिवाय दुसरी जागा शरद यादव यांच्याकडे होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!