Aurangabad Crime Update : ताजी बातमी : विद्यार्थिनीचा खून करून पसार झालेल्या तरुणास अटक…

औरंगाबाद : देवगिरी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची काल गळा चिरून हत्या करण्याची घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती. अखेर पोलिसांनी खून करून फरार झालेल्या आरोपी तरुणाला करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिकमधील लासल गाव येथून रविवारी ताब्यात घेतले आहे. देवगिरी कॉलेज जवळील रचनाकार कॉलनीत काल शनिवारी खुनाची घटना घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सुखप्रीत कौर ऊर्फ कशीश प्रीतपालसिंग ग्रंथी देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तिच्यावर आरोपी शरणसिंग सेठी (२०, रा. भीमपुरा, उस्मानपुरा) याचे एकतर्फी प्रेम होते. दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते. शरणसिंग अनेक दिवस सुखप्रीतचा पाठलाग करीत होता. तिच्या कुटुंबीयांनीही त्याला समजावून सांगितले तरी तो ऐकत नव्हता.
दरम्यान काल शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कशीश मैत्रिणीसोबत महाविद्यालयात आली. आरोपी शरणसिंगनेही तिचा माग काढत तिला गाठले आणि तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. भेटण्याचा आग्रह धरला परंतु तिने नकार देत दुपाच्या सुमारास सुखप्रीत आपल्या मैत्रिणींसोबत रचनाकार कॉलनीजवळील एका कॉफीच्या दुकानात गेली. तेथेही आरोपी शरणसिंग तिचा पाठलाग करीत आला. आणि सुखप्रीत हॉटेलच्या बाहेर येताच त्याने तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिला २०० फूट अंतरावर असलेल्या रिकाम्या प्लॉटच्या दिशेने बळजबरीने नेले आणि तिच्यागळ्यावर , मानेवर, पोटावर धारदार हत्याराने १८ वार केले. त्यानंतर शरणसिंग तेथून तो दुचाकीवर पळून गेला.
हि घटना घडतातच सुखप्रीतच्या मैत्रिणीने कशीशच्या भावाला फाेन करून ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. दोन्ही भाऊ घटनास्थळी आले. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली होती. अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला नाशिकमधील लासल गाव येथून रविवारी ताब्यात घेतले. वेदांतनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.