Prasangik । Blog : भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो : बुद्ध -आंबेडकरांच्या कार्यात पूर्णतः समर्पित व्याक्तीमत्व …

भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या औरंगाबादच्या भूमीतून थेट बुद्धगयेत पोहोचलेले बौद्ध भिक्खू . आज त्यांचा ६३ वा वाढदिवस साजरा होत आहे. निर्सग नियमाप्रमाणे वाढ दिवस येतात जातात त्यात विशेष असे काहीही नसते पण या निमित्ताने कुठल्याही विधायक कार्यासाठीआयुष्य झोकून देणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या गुणगौरवासाठी हा एक महत्वाचा दिवस असतो. म्हणून त्यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष मंगल कामना. त्या या साठी कि , गेल्या ४३ वर्षांपासून भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो आपल्या धम्म कार्याच्या माध्यमातून बुद्धाच्या धम्म स्पर्शाने असंख्य लोकांच्या जीवनात आनंद उधळत आहेत.
जेव्हापासून म्हणजे १९७९ पासून विशुद्धानंद बोधी औरंगाबाद शहरात प्रवज्जा घेऊन आले तेंव्हापासून माझा आणि भन्तेजींचा परिचय आहे . मंगल मैत्री आहे. बुलडाणा जिल्ह्यातील टाकळी वतपाळ , तालुका नांदुरा येथून विशुद्धानंद बोधी शिक्षणाच्या निमित्ताने औरंगाबादेत आले. या काळातील त्यांच्या धम्माच्या वेडाने त्यांनी १९८६ मध्ये बुद्धगयेत प्रवज्जा घेतली म्हणजे ते संसाराचा , कुटुंबाचा त्याग करून आयुष्यभरासाठी पूर्णवेळ भिक्खू झाले. खरे तर विशुद्धानंद बोधी त्यांच्या आईचे एकुलते एक पुत्र परंतु पुत्र प्रेमाचा लोभ सोडून त्यांच्या आदर्श आईने हा मुलगा मोठ्या आनंदाने बौद्ध धम्माल दान दिला. हा तरुण आपल्या कर्तृत्वाने स्वतः तर बुद्धमय झालाच परंतु जेथे जेथे जाईल तेथे तेथे धम्म ध्वज उंच फडकावला असेच अभिमानाने म्हणता येईल.
औरंगाबादचा प्रारंभीचा काळ
औरंगाबादच्या भूमीत डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे आणि बुद्धाचे , फुले शाहूंचे विचार ज्यांनी ज्यांनी रुजविले त्यात पँथरनेते गंगाधर गाडे , प्रीतमकुमार शेगावकर आणि धम्माच्या बाबतीत भन्ते विशुद्धानंद बोधी आणि त्यांचे समकालीन भिक्खू खेमधम्मो यांचा सिंहाचा वाट आहे. त्या काळात अनेक ठिकाणी दलित – श्रमिकांच्या वसाहती गाडे – शेगावकर आणि त्यांच्या पँथर्स सहकाऱ्यांकडून वसविण्यात येत होत्या. या सर्व वस्त्यांमध्ये दर रविवारी बुद्ध वंदना आणि सभा होत असत . त्यावेळी भिक्खूंची संख्याही कमी होती या काळात भन्ते विशुद्धानंद आणि भन्ते खेमधम्मो हि जोडी सर्व वसाहतींमध्ये बुद्धाचे विचार पोहोचवत असत पुढे भन्ते खेमधम्मो नांदेकडे, मुळाव्याकडे गेले आणि त्या भागात धम्माचे मोठे काम सुरु केले परंतु भन्ते विशुद्धानंद बोधी यांनी औरंगाबादलाच आपली कर्मभूमी मानून धम्माचे प्रचंड मोठे काम केले जे शब्दात मांडता येत नाही.
बुद्ध लेणीच्या पायथ्याशी धम्म यात्रा सुरु केली
विद्यापीठाला लागून असलेल्या औरंगाबादच्या बुद्ध लेणीच्या पायथ्याशी भन्ते उपाली यांच्यासोबत राहून भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी बुद्ध लेणीचा हा पायथा इतका समृद्ध केला कि , त्यांनी या ठिकाणी उभारलेले महाविहार आज जागतिक बैद्ध धर्मियांचे आदराचे स्थान झाले आहे. दरवर्षी धम्म चक्र प्रवर्तनदिनी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. याच्या आधी विजया दशमीच्या दिवशी अनेक बौद्ध धर्मीय लोक सुद्धा औरंगाबादच्या कर्णपुऱ्यात भरणाऱ्या देवीच्या यात्रेत जायचे परंतु हि प्रथा मोडीत कडून भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी हा पायंडा मोडीत काढून प्रचंड मोठा पर्याय उभा केला. आज हि धम्म यात्रा पाहण्यासाठी राज्यभरातील बौद्ध उपासक मोठ्या संख्येने येथे हजेरी लावतात हे विशुद्धानंद बोधी महाथेरो यांचे कार्य प्रशंसनीय आहे.
बुद्ध लेणी महाविहार जगभरचे आकर्षण
आज या ठिकाणी भन्ते विशुद्धानंद यांनी निर्माण केलेला भिक्खू संघ आपली धम्मसेवा देत आहे. जगभरातील नामवंत भिक्खूंना भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी या ठिकाणी आणून औरंगाबादकरांना धम्म विचारांची पर्वणीच दिली हि पर्वणी औरंगाबादकर कधीही विसरू शकणार नाहीत. दरम्यान औरंगाबादेत धम्माचे इतके मोठे काम करून शांत बसतील ते विशुद्धानंद कसले ? त्यांनी बौद्ध उपसकांमध्ये धम्मविषयक जाणीव जागृत व्हाव्यात म्हणून देशभर धम्म सहली सुरु केल्या. याच ठिकाणी उपासक -उपसिकांसाठी आणि लहान मुलांसाठी श्रामणेर शिबिरे सुरु केली . जागतिक धमदानातून विपश्यना कुट्या तयार केल्या. ज्याचा लाभ आजही अनेक बौद्ध बांधव घेत आहेत.
औरंगाबाद ते बुद्धगया
पुढे भन्ते विशुद्धानंद बोधी यांनी आपला धम्म कार्याचा मोर्चा पुणे , मुंबईकडे वळवला आणि आपल्या परिश्रमातून त्यांनी या शहरातही भव्य दिव्या बुद्ध विहाराची निर्मिती करून बौद्ध धम्माची प्रचार केंद्रे तयार केली. पण भंतेजी इथेच थांबले नाही . बुद्ध गयेत आपलेही काही योगदान असावे असा त्यांचा संकल्प होता त्यामुळे त्यांनी बुद्ध गया गाठली आणि जागतिक आकर्षण असलेल्या बुद्धगयेत आपल्या दानशूर उपसकांच्या आर्थिक सहयोगातून ५०० उपासक थांबू शकतील असे विशाल धम्मनिवास उभे केले. त्यांचे हे धम्म कार्य आणि हातात घेतलेले धम्मकार्य पूर्णत्वास नेण्याचा दृढ संकल्प कोणाच्याही नैराश्यावर मात करणारा आहे.
आपल्या आजवरच्या धम्मकार्यात त्यांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आहे. तब्बल ४० भिक्खूंना प्रवज्जा दिली आणि हजारो श्रामणेर भिक्खूंना धम्म विचाराचे दान दिले. पण इतके करूनही विशुद्धानंद थांबत नाहीत. कोरोनाच्या काळात भंतेजी बुद्धगयेत होते . त्यांनाही या दुर्धर साथीने गाठलेच . परंतु आपल्या मनोबलाने त्यांनी यावर मत करून विजय प्राप्त केला. या काळात भन्तेजींशी सातत्याने बोलणे व्हायचे तेंव्हा त्यांची काळजी करावी अशी स्थिती झाली होती. ते संवाद आठवले कि आजही अंगावर काटा उभा राहतो. केवळ कुशल कार्य केल्यामुळेच आपण कोरोनातून बाहेर आल्याचे ते सांगतात.
बौद्ध उपासकांनी जबाबदारी आणि बौद्ध भिक्खू
या निमित्ताने मला हे सांगायचे आहे कि , आज समाजातील , धम्मातील अनेक शहाणे लोक बौद्ध भिक्खुंनी असे राहावे तसे राहावे असे मार्गदर्शन करताना दिसतात. खरे तर लोकांना आयुष्यात दोन तीन वेळच बौद्ध भिक्खूंची आठवण होते ते प्रसंग म्हणजे विवाह , मृत्यू , किंवा एखादेवेळेस वस्तू शांती … एरवी भिक्खू कुठे रहातात ? त्याच्या विहाराची अवस्था कशी आहे ? ते काय खातात ? स्वतःच्या गरज कशा भागवतात याची कुठलीही विचारपूस होत नाही. कोरोनाच्या दोन वर्षात तर सर्वच भिक्खूना उपासमार सहन करावी लागली , कुणाला औषधी , वैद्यकीय सुविधा मिळू शकल्या नाही हे मी जवळून पहिले आहे.
जाता जाता …
भन्ते विशुद्धानंद बोधी यांच्या बऱ्या -वाईट वाटचालीचा मी सुद्धा एक जवळचा साक्षीदार आहे . त्यांनी प्रवज्जा घेतली तेंव्हापासून मागे कधीही वळून पहिले नाही. घरी आईकडेही पहिले नाही. आई झोपडीत , जन्माला आली , झोपडीतच जगली आणि झोपडीतच विसावली असे साश्रू नयनांनी भंतेजी आपले मन हलके करताना त्यांची आई गेली तेंव्हा सांगत होते. पण त्यांच्या या कौटुंबिक त्यागामुळे लाखो लोकांपर्यंत बुद्धाचा कल्याणकारी विचार पोहोचविण्याचे जे काम त्यांनी केले आहे ते नकीच अतुलनीय , प्रेरणादायक आणि आदर्शवत आहे. त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी पुनश्च अनेक मंगल कामना.
बाबा गाडे
मुख्य संपादक , महानायक , औरंगाबाद
9421671520