IndiaNewsUpdate : मोठी बातमी : डॉलरच्या तुलनेने रुपया निच्चांकी पातळीवर तर महागाईचा निर्देशक सर्वोच्च पातळीवर

मुंबई : एकीकडे वाढती महागाई आणि डॉलरच्या तुलनेत होत असलेली रुपयाची घसरण काही केल्या थांबायला तयार नाही. मंगळवारी चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 28 पैशांनी घसरून 77.73 रुपयांच्या ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर आला आहे. यामुळे कच्च्या तेलासाठी भारताला अधिक डॉलर मोजावे लागत आहेत . भारतातील इंधनाची गरज भागवण्यासाठी 80 टक्के कच्चे तेल आयात केले जाते. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. दरम्यान महागाईचा निर्देशांक नऊ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान देशातील अर्थ तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाची आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. हा दर 80 रुपये प्रति डॉलरपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. व्याज दरवाढीच्या जागतिक संकेतामुळे परदेशी गुंतवणुकदारांकडून शेअर बाजारात विक्री सुरू आहे. त्याचा दबाव रुपयावर आला आहे. त्याशिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने आणि अन्य चलनांच्या तुलनेत डॉलर आणखी मजबूत झाल्याने रुपया कमकुवत झाला आहे.
रुपयाच्या तुलनेत डॉलर महाग झाल्यास भारतीय इंधन कंपन्यांना कच्चे तेल खरेदी करण्यासाठी अधिक डॉलर मोजावे लागतील. दरम्यान परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खर्चातही वाढ होणार आहे. परदेशातील शिक्षण आणि तेथील वास्तव्याचा खर्च आणखी महाग होण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान प्रवेश प्रक्रिया सुरू होते. त्यावेळी डॉलरची किंमत वाढते. डॉलरचा दर वधारल्यास पालकांवर आणखी आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे.
महागाईचा निर्देशांक नऊ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर
खाद्य तेलाचे दर आधीपासूनच कडाडले आहेत. देशातंर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी खाद्य तेल आयात करण्यात येत आहे. डॉलरचा दर वाढल्याने खाद्य तेलाच्या आयातीसाठी आणखी परदेशी चलन खर्च करावे लागतील. त्याचा परिणाम खाद्य तेलांच्या किंमतीवर होणार आहे. आधीच देशातील किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईनेही एप्रिलमधील अनेक वर्षांचा विक्रम मोडला आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी घाऊक किंमत आधारित निर्देशांक डेटा जारी केला, जो नऊ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहे.
खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या किमतीत मोठी वाढ
वाणिज्य मंत्रालयाच्या मते, एप्रिलमध्ये WPI 15.08 टक्क्यांवर पोहोचला, जो नऊ वर्षांचा उच्चांक आहे. यापूर्वी मार्चमध्ये WPI 14.55 टक्के होता. जर आपण गेल्या वर्षी एप्रिलबद्दल बोललो तर घाऊक महागाईचा दर 10.74 टक्के होता. एप्रिलची आकडेवारी एकत्र केली तर, घाऊक महागाईचा दर गेल्या 13 महिन्यांपासून 10 टक्क्यांच्या वर राहिला आहे, त्यामुळे किरकोळ महागाईवर दबाव आहे. या काळात खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे ज्यामुळे एकूण घाऊक महागाईचा दर वाढला.