NashikNewsUpdate : पुणे-इंदौर महामार्गावर भीषण अपघात , चौघांचा मृत्यू

नाशिक : मनमाडपासून जवळ असलेल्या पुणे-इंदौर महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात ४ मित्रांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. एका मारुती कारमधून हे पाच मित्र येवल्याकडून मनमाडला येत असताना समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या व्हॅनला कट मारला. यामुळे चालकाचं कारवरुन नियंत्रण सुटलं आणि गाडी झाडावर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातानंतर पुणे-इंदौर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि जखमीला रुग्णालयात आणण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर वाहतूक सुरळीत केली गेली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात इतका भीषण होता की यात कारचा चक्काचूर होऊन त्यातील ५ पैकी चौघांचा मृत्यू झाला. तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, आणि गोकुळ हिरे अशी मृतांची नावे आहेत. तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी असून त्याला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच मयतांच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली.
आणखी दोन अपघातात दोन ठार , दोन जखमी
दरम्यान बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यात तेलगाव आणि भोगलवाडी या दोन अपघातात दोन जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. वडवणी तालुक्यातील बाबीतांडा येथून दोन सख्खे भाऊ आदित्य आणि अभिजित हे दुचाकीवर तेलगावला आले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात आदित्य शंकर राठोड ( वय २० वर्ष ) हा ठार झाला. अभिजित शंकर राठोड ( वय २२ वर्ष ) हा गंभीर जखमी झाला आहे.
तर धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथे झालेल्या अपघातात महादेव साहेबराव तोंडे ( वय ३८ वर्ष ) आणि रघुनाथ वैजनाथ तोंडे ( वय ४२ वर्ष ) हे दोघे भोगलवाडी येथे दुचाकीवर लग्नासाठी जात होते. दरम्यान भोगलवाडी पाटीवर एका अज्ञात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. धडक बसताच दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. जखमींना प्रथम धारुर येथे रुग्णालयात दाखल केलं. परंतु महादेव साहेबराव तोंडे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांना अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं. परंतु रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.