Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaFireNewsUpdate : इंदौरमध्ये ७ जणांचा होरपळून मृत्यू, ८ जण गंभीर तर मथुरा येथील अपघातातही ८ ठार

Spread the love

इंदौर : इंदौरमध्ये शुक्रवारी रात्री एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे तर ८ जण गंभीररित्या भाजल्याचे  वृत्त आहे . आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. विजय नगरच्या स्वर्णबाग नगरमध्ये ही घटना घडली आहे.सर्व जखमींना एमवाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान मथुरा एक्सप्रेस वे वरील एका अपघातातही ८ जण ठार झाले आहेत. 

मृतांमध्ये ईश्वर सिंग सिसोदिया (४५), नीतू सिसोदिया (४५), आशिष (३०), गौरव (३८), आकांक्षा (२५) यांचा समावेश आहे. मृतांमध्ये ४० आणि ४५ वयोगटातील दोघांची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये एका जोडप्याचाही समावेश आहे.

पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीमुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ६ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. सर्वजण झोपेत असताना ही दुर्घटना घडली. आगीनं लगेचच भीषण रूप धारण केलं. काही समजण्याआधीच काही जण होरपळले तर काही जण गुदमरले.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. पोलिसांनी मृतांचे मृतदेह एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, खजराना रिंग रोडवरील स्वर्ण कॉलनीतील इमारतीला आग लागली. येथे १३ दुचाकी आणि एक चारचाकी वाहन जळून खाक झालं आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत इन्साद पटेल यांची आहे. येथे १०फ्लॅट होते. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीतून ९ जणांची सुटका करून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

मथुरा येथेही मोठा अपघात , एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

दरम्यान मथुरा येथील यमुना एक्सप्रेस-वेवर शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला असून २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये वृद्ध दाम्पत्य, त्यांची दोन मुले, त्यांच्या दोन पत्नी आणि ६ वर्षांचा नातू यांचा समावेश आहे. वृद्ध दाम्पत्याचा एक मुलगा आणि ३ वर्षांचा नातू गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमध्ये कुटुंबाचे ९ सदस्य होते. हे सर्व हरदोई येथील संदिला भागातील रहिवासी होते. सर्वजण लग्नात सहभागी होण्यासाठी नोएडाला जात होते.

अपघाताचे वृत्त समजताच जेंव्हा पोलिस घटनास्थळी आले तेंव्हा त्यांना दुसरे कोणतेही वाहन घटनस्थळाजवळ आढळून आले नाही त्यामुळे वाहकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने पुढे चालणाऱ्या वाहनाला धडक दिली.  नौझील परिसरात हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, सकाळी एका वाहन चालकाने डायल-११२ ला अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्वांना अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढले. या धडकेत कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.अशा स्थितीत कटरने कार कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. या दरम्यान जखमी बराच वेळ गाडीतच अडकून पडले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त  कुटुंब हरदोई येथील बहादूरपूर-सांडिला येथील रहिवासी होते. लग्नात सहभागी होण्यासाठी संपूर्ण कुटुंब नोएडाला जात होते. पोलिसांनी सांगितले की, राजेश, लल्लू, श्रीगोपाल, संजय, निशा, चुटकी, नंदनी, ६ वर्षीय धीरज आणि ३ वर्षीय क्रिश गाडीत होते. राजेश, श्री गोपाल आणि संजय हे सख्खे भाऊ आहेत. या अपघातात लल्लू आणि त्याची पत्नी चुटकी, दोन मुले राजेश आणि संजय, दोन सून निशा आणि नंदनी आणि ६ वर्षांचा नातू धीरज यांचा मृत्यू झाला. लल्लू यांचा मुलगा श्रीगोपाल आणि ३ वर्षांचा नातू क्रिश हे गंभीर जखमी आहेत. मथुरेच्या या दुःखद अपघातावर मुख्यमंत्री योगींनी शोक व्यक्त केला आहे. जखमींवर चांगले उपचार करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!