BhimaKoregaonNewsUpdate : मोठी बातमी : भीमा कोरेगाव दंगलीच्या खटल्यातून संभाजी भिडे यांचे नाव गायब ..

पुणे :भीमा कोरेगाव दंगलीच्या आरोपपत्रातून ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान’चे संस्थापक संभाजी भिडे यांचे नाव वगळण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगाला दिली आहे.
या दंगलीमध्ये संभाजी भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात एकूण २२ गुन्हे दाखल असून ४१ आरोपींवर वर्षभर पूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये संभाजी भिडे यांचे नाव नसल्याची माहिती पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगा समोर असलेल्या सुनावणीदरम्यान देण्यात आली आहे.
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी येथे मोठा हिंसाचार झाल्यानंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते .या हिंसाचाराप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी हा हिंसाचार घडण्यापूर्वी वढू बुद्रुक आणि भीमा कोरेगाव परिसरातील गावांमध्ये द्वेषपूर्ण भाषणे केल्यामुळे १ जानेवारी रोजी दंगल उसळल्याचा आरोप करण्यात येत होता परंतु पोलिसांच्या म्हणण्यानुसार भीमा कोरेगाव दंगलीत भिडे यांचा प्रत्यक्ष संबंध आढळून आला नाही.
ठाण्यातील वकील आदित्य मिश्रा यांनी संभाजी भिडे यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी होत नसल्याचे सांगत त्यातून यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आयोगाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव दंगल प्रत्यक्ष संबंध आढळून येत नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे नाव खटल्यातून वगळण्यात आल्याचा लेखी अहवाल पोलिसांनी दिला आहे.त्यामुळे दंगलीबाबतच्या आरोपपत्रात संभाजी भिडे वगळता इतर ४१ आरोपींची नावे आहेत.