RajThackerayNewsUpdate : मोठी बातमी : अखेर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल , मनसेच्या १५ हजार कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई, राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ..

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या तीन सभेत दिलेल्या भाषणांची अखेर गंभीर दखल घेत पोलिसांनी आपल्या कारवाईला आता सुरुवात केली आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत काही अटींचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून सभेचे संयोजक आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान राज्यातील मनसेच्या 15 हजार कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा जारी केल्या असून काही जणांना मुंबई सोडण्याचे आदेश दिल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त जारी केला असून राज्यातील पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई , ठाण्यातील सभेनंतर औरंगाबाद शहरात रविवारी राज ठाकरे यांची सभा पार पडल्यानंतर या सभेचा पूर्ण अभ्यास करून या सभेत कोणत्या अटींचे उल्लंघन झाले ? याविषयीचा अहवाल तयार करून तो गृहविभागाकडे पाठवून देण्यात आला होता ही प्रक्रिया पूर्ण होताच पोलिस आता सक्रिय झाले आहेत.
औरंगाबाद पोलिसांची कारवाई
याच प्रक्रिये अंतर्गत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून औरंगाबाद पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यावर भडकावू भाषण देत वैयक्तीक टीका टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त असून यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी सशर्त परवानगी देताना पोलीस आयुक्तांनी १६ अटी घातल्या होत्या. त्यातील काही अटींचे उलंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत कारवाई निश्चित होणार असे वृत्त या आधीच महानायक ऑनलाइनने दिले होते.
या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांनाही नोटिसा पोलिसांनी पाठवल्या आहेत.
औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंच्या विरोधात कलम 116, 117 आणि 153 अ, भादवि 1973 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 सुधारीत 31 जुलै 2017 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात राज ठाकरे यांच्यासोबतच राजीव जेवळीकर आणि इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
औरंगाबादेत उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्यासह पथकाने मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांचे घर गाठून त्यांना नोटीस बजावली. याशिवाय सतनामसिंग गुलाटी तसेच अन्य पददधिकाऱ्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या.
दरम्यान राज्याच्या पोलीस महासंचालकांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत जर कुणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
१५ हजार कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई
मनसे नेते राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून थेट सरकारला दिलेले आव्हान आणि त्यांची सभेतील वक्तव्ये लक्षात राज ठाकरे यांच्यासाहित मनसेच्या १५ हजार कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून अनेकांना मुंबई सोडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान जातीय तेढ निर्माण करून कुणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस महासंचालकांनी दिला आहे.
पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितले की , या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ३० हजार होमगार्ड राज्यात तैनात केले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या ७ तुकड्याही तैनात आहेत. राज्यातील सर्व पोलीस यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक एकोप्यासाठी स्थानिक पातळीवर बैठका घेण्यात येत आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कायद्याची अंमलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे. कुणीही कायदा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. महाराष्ट्रातील जनतेने शांतता सुव्यवस्था राखावी असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केली आहे. समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
आम्ही कायद्याचा सन्मान राखणारे लोक आहोत : बाळा नांदगावकर
पोलिसांच्या करवाईवर बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की , मुंबई पोलीस आयुक्तांनी नोटीस दिली आहे . त्याचे स्वागत आहे. कायद्याचे पालन राखणारे आम्ही आहोत. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य केले आहे. त्यांचा मानसन्मान राखायला हवा. ईद हा मुस्लीम बांधवांचा सण आहे. आमचे काहीच म्हणणे नाही. बाळा नांदगावकरमुळे समाजाला त्रास होत असेल तर माझ्यावरही कारवाई झाली पाहिजे. कायदा मोडणाऱ्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी.