Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मध्यप्रदेश , राजस्थानसह अनेक भगत हिंसाचाराच्या घटना

Spread the love

जयपूर : राजस्थानमधील जोधपूरमध्ये आज ईदनिमित्त दोन समुदायांमध्ये हाणामारी झाल्यानंतर कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जोधपूरमधील जलौरी गेट परिसरात झेंडे लावण्यावरून काल रात्रीही हाणामारी झाली होती. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान देशातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन आणि या घटनांवर नियंत्रण ठेवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर विरोधी पक्ष, नागरी समाज आणि कार्यकर्त्यांकडून टीका होत आहे.

जोधपूर येथे नेमके के घडले ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज पाच ठिकाणी जोधपुर येथे दगडफेक करण्यात आली. हिंसाचाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, परिसरात अजूनही तणाव कायम आहे. संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन पोलिस आयुक्तालयाने जोधपूर आयुक्तालय क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. जोधपूरमधील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जे 4 मे 2022 रोजी मध्यरात्री 12.00 पर्यंत राहील.

जोधपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद

दरम्यान कोणीही अफवा पसरवू नये म्हणून जोधपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून पोलिस संरक्षणात ईदची नमाज अदा करण्यात आली. जोधपूरमध्येही तीन दिवसीय परशुराम जयंती उत्सव सुरू असून धार्मिक ध्वजावरून दोन समुदायांमध्ये वाद झाला आणि त्याचे रुपांतर हिंसाचारात झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जालोरी गेट परिसरातून हा वाद सुरू झाला.
सोमवारी मध्यरात्रीनंतर अल्पसंख्याक समाजातील काही लोक ईदनिमित्त जलौरी गेटजवळील चौकात धार्मिक झेंडे फडकवत असताना हा वाद सुरू झाला.

झेंड्याच्या रंगावरून झाला वाद

चौकाचौकात स्थापित स्वातंत्र्यसैनिक बालमुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्याला लोकांनी झेंडे लावले. ज्याला हिंदू समाजातील लोकांनी विरोध केला होता. दरम्यान परशुराम जयंतीला लावलेल्या भगव्या ध्वजाच्या जागी इस्लामिक ध्वज लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला, त्यामुळे दोन्ही समाजाचे लोक समोरासमोर आले आणि त्यांच्यात हाणामारी झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्री अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठ्याही वापरल्या.

यादरम्यान स्थानिक पोलिस चौकीवरही हल्ला करण्यात आला. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे झालेल्या दगडफेकीत किमान चार पोलीस जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता,” असे पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने एजन्सीला सांगितले.

मुख्यमंत्री गहलोत यांचे शांततेचे आवाहन

राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जोधपूरच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले असून त्यांनी  परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. दरम्यान गेहलोत यांनी मंगळवारी सकाळी केलेल्या आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ,  “जोधपूरच्या जलौरी गेटजवळ दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षामुळे तणाव निर्माण होणे दुर्दैवी आहे. कोणत्याही परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

देशातील अनेक राज्यात अशांतता

देशाच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून धार्मिक, तसंच जाती-धर्माशी संबंधित गोष्टींवरून अशांतता निर्माण झाल्याचे दिसत आहे. यामुळे हिंसाचार, दगडफेक, जाळपोळ यांसारख्या घटना घडत आहेत. दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगाल या किमान पाच राज्यांमध्येही गेल्या काही आठवड्यांत अशाच प्रकारचे संघर्ष पाहायला मिळाले आहेत. रामनवमी, हनुमान जयंती आणि रमजानच्या काळात हा हिंसाचार झाला.  जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनागमध्येही अशीच घटना घडली. एका मशिदीबाहेर जोरदार दगडफेक करण्यात आली. ईदच्या नमाजनंतर आंदोलकांनी सुरक्षा दलावरही दगडफेक केली. दरम्यान मध्य प्रदेशातल्या खरगोनमध्ये  झालेल्या दंगलीला 22 दिवस उलटल्यानंतर कर्फ्यूमध्ये  सण साजरे केले जात आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!