GaneshNaikNewsUpdate : आ. गणेश नाईक यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

मुंबई : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेले भाजपाचे आमदार तथा माजी मंत्री गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शनिवारी ठाणे न्यायालयाने फेटाळला. यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
सदर महिलेच्या तक्रारीनंतर धमकी प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात तर लैंगिक अत्याचार प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणांत गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली होती.
दरम्यान नाईक यांच्या विरोधकांच्या दबावामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तीवाद गणेश नाईक यांच्या वकिलांनी केला होता. तर गणेश नाईक यांच्यावर दाखल असलेले गुन्हे गंभीर स्वरूपातील आहे. त्यामुळे त्यांची कोठडी मिळणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता. दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर अर्जावरील निकाल शनिवारी देण्यात आला असून नाईक यांचा जामीनअर्ज फेटाळल्याची माहिती पीडित महिलेच्या वकिलांनी दिली. त्यामुळे गणेश नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.