Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : खा. नवनीत राणा यांची ‘जात’ देवेंद्र फडणवीस यांनाही आठवली !! सरकारला दिले आव्हान…

Spread the love

मुंबई : खा. नवनीत राणा यांना कारागृहात अतिशय हीन वागणूक देण्यात आली. त्या मागासवर्गीय समाजाच्या आहेत, याची त्यांना जाण करून देण्यात आली. प्यायला पाणी सुद्धा देण्यात आले नाही. एक महिला असताना त्यांना प्रसाधन गृहात जाऊ देण्यात आले नाही. किती द्वेष करायचा?, हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानात म्हणायची? मुळात हा राजद्रोह कसा होऊ शकतो? तो राजद्रोह असेल तर आम्ही रोज हनुमान चालिसा म्हणू. लावा आमच्यावर राजद्रोह असे आव्हान भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला केले आहे. 

मनसे नेते राज ठाकरे यांनी सुरु केलेल्या भोंग्याच्या विषयावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीवर भाजपच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. भोंगा वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यासाठी सर्व पक्षांची बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक संपल्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राज्य सरकारवर  हल्लाबोल केला. फडणवीसांनी या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांवरील हल्ला, राणा दाम्पत्य यावर ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

आपल्या सर्वपक्षीय बैठकीवरील बहिष्काराचे कारण सांगताना फडणवीस म्हणाले कि , भोंगा वादाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी आम्हाला बैठकीचं निमंत्रण दिलं होतं, पण हिलटरलशाहीमुळे आम्ही या बैठकीवर बहिष्कार घातला. सरकारने संवादासाठी जागा ठेवली नाही एवढ्या महत्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री नाहीत मग ही बैठक टाईमपास आहे का? अशा गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन फायदा काय? असेही फडणवीस म्हणाले. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलीस संरक्षणात आमच्या नेत्यांवर हल्ले करत असतील आणि त्यानंतरही एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर अशा बैठकींना जाऊन फायदा काय? असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

तुम्ही कितीही हल्ले करा आम्ही थांबणार नाही

आम्ही पोलखोल यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेतील सगळा भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर मांडला. पण महाराष्ट्रात अशा प्रकारची स्थिती आम्ही कधीच पाहिली नाही. लोकशाहीमध्ये यापेक्षा वेगळं काय करायचं असतं? त्यांनी आमच्या पोलखोल यात्रेवर आणि रथावर हल्ला केला. सत्ताधाऱ्यांना असं वाटत आहे की असे हल्ले करून आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलायचं थांबू, मात्र आम्ही थांबणार नाही, असे  देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला आव्हान दिले आहे.

खा. नवनीत राणा मागास जातीच्या म्हणून त्यांना हीन वागणूक

फडणवीस पुढे म्हणाले कि , किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत, पोलिस ठाण्यासमोर हल्ला होतो, हे गंभीर आहे. याबद्दल मी स्वतः केंद्रीय गृहसचिवांना पत्र दिले आहे. ते योग्य दखल घेतील, असा मला विश्वास आहे. केरळात, पश्चिम बंगालमध्ये आमच्या अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली. तीच स्थिती आज महाराष्ट्रात आहे. पण आम्ही संघर्ष करू. आम्ही गप्प बसणार नाही. खा. नवनीत राणा यांना कारागृहात अतिशय हीन वागणूक देण्यात आली. त्या मागासवर्गीय समाजाच्या आहेत, याची त्यांना जाण करून देण्यात आली. प्यायला पाणी सुद्धा देण्यात आले नाही. एक महिला असताना त्यांना प्रसाधन गृहात जाऊ देण्यात आले नाही. किती द्वेष करायचा?, हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानात म्हणायची? मुळात हा राजद्रोह कसा होऊ शकतो? तो राजद्रोह असेल तर आम्ही रोज हनुमान चालिसा म्हणू. लावा आमच्यावर राजद्रोह.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!