IndiaNewsUpdate : आ. जिग्नेश मेवानी यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय , भाजप कार्यकर्त्याने सांगितले गुन्हा दाखल करण्याचे कारण….

गुवाहाटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ट्विट केल्यामुळे आसाम पोलिसांच्या अटकेत असलेले गुजरातचे आमदार आणि दलित नेते आ. जिग्नेश मेवाणी यांच्या जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवल्यामुळे उद्या न्यायालयाकडून त्यांचा जामीन आदेश येण्याची शक्यता आहे. कोक्राझार येथील स्थानिक भाजप नेत्याने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर श्री मेवाणी यांना आसाम पोलिसांच्या पथकाने पोलिसांनी बुधवारी रात्री साडेअकरा वाजता पालनपूर सर्किट हाऊसमधून अटक केली होती. तेथून त्यांना आसामला नेण्यात आले. ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी मेवाणीविरोधात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान त्यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे कि , “मोदीजी, तुम्ही राज्य यंत्रणेचा गैरवापर करून असंतोष चिरडण्याचा प्रयत्न करू शकता. पण तुम्ही सत्याला कधीच कैद करू शकत नाही. ” गुजरातच्या बनासकांठामधील वडगाम मतदारसंघातील अपक्ष आमदार मेवाणी यांनी पुढील निवडणुका काँग्रेस उमेदवार म्हणून लढणार असल्याचे सांगितले होते.
आ. जिग्नेश मेवाणी यांनी 18 एप्रिल रोजी केलेल्या दोन ट्विटमुळे डे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मेवानी यांनी “गोडसे यांना देव मानणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जातीय संघर्षाविरोधात शांतता आणि सलोख्याचे आवाहन करावे.” असे ट्विट केले होते त्यावरून मेवाणी विरुद्ध IPC कलम 120B (गुन्हेगारी कट), 153 (A) (दोन समुदायांविरुद्ध शत्रुत्व वाढवणे), 295 (A) आणि 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने बोलणे) ट्विट आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारकर्ते अरुप कुमार डे कोण आहेत ?
अरुप कुमार डे यांच्या तक्रारीवरून आसाम पोलिसांनी गुजरातमधील वडगाम येथून आमदार जिग्नेश मेवाणी यांना अटक केली होती. अरुप कुमार डे बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिल (BTC) चे निवडून आलेले सदस्य आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या प्रभारी कौन्सिल सरकारचे कार्यकारी सदस्य आहेत. याबद्दल एनडीटीव्हीशी बोलताना फिर्यादी अरुप कुमार डे यांनी म्हटले आहे कि ,पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलच्या “नकारात्मक” पोस्टमुळे भाजप कार्यकर्त्यांना त्रास होतो त्यामुळे लोकांनी त्यांच्याबद्दल ट्विट करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत आणि पंतप्रधान मोदींबद्दल अशा दिशाभूल करणाऱ्या आणि कट रचणाऱ्या पोस्ट आणि ट्विट आम्ही खपवून घेणार नाही. हा संदेश मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांपर्यंत जावा म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात हा एफआयआर दाखल करून त्यांच्याविरुद्ध कठोर कलमे लावली आहेत.
आम्ही भाग्यवान आहोत की मोदीजी आमचे पंतप्रधान आहेत…
आपली बाजू मांडताना डे म्हणाले की, मी बऱ्याच दिवसांपासून मेवाणीचे ट्विट पाहत होतो. “ते नेहमी पंतप्रधान मोदींबद्दल नकारात्मक लिहायचे. आम्ही भाग्यवान आहोत की मोदीजी आमचे पंतप्रधान आहेत आणि मेवाणी त्यांचे नाव अलीकडच्या (घटना) हिंसाचाराशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. याला पीएम मोदी जबाबदार आहेत का? ते म्हणतात गोडसे हे पंतप्रधान मोदींचे देव आहेत, याचा पुरावा काय? त्याच्याकडे आहे का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.