MumbaiNewsUpdate : मोठी बातमी : अखेर ‘मातोश्री’ , ‘हनुमान चालीसा’ , राणा दांपत्य आणि गृहमंत्र्यांचे गंभीर आरोप…

मुंबई : काहीही झाले स्त्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ समोर आम्ही हनुमान चालीसा म्हणणारच या भूमिकेवर ठाम असलेल्या राणा दांपत्याने अखेर आपला हट्ट मागे घेतला असल्याचे जाहीर केले आहे. या भूमिकेमुळे खा. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा चर्चेत आले होते. दरम्यान त्यांना अडवण्यासाठी शिवसैनिकांनी आणि पोलिसांनी मातोश्री कलानगर भागात पूर्णतः नाका बंदी केली होती तर पोलिसांनी राणा दांपत्याला त्यांच्या घराबाहेरच सुरक्षा कडे तयार केले होते त्यामुळे आता आपल्याला काहीच करता येत नाही याची जाणीव झाल्याने पंतप्रधानांच्या दौऱ्याचे कारण पुढे करीत आपली भूमिका बदलल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान गेल्या दोन दिवसात राणा दांपत्याच्या भूमिकेमुळे मुंबईच्या काही भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांची नोटीस आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आवाहन केल्यानंतरही राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम होते. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी ‘मातोश्री’ परिसरात जाण्याचे आम्ही टाळत असल्याची माहिती नवनीत आणि रवि राणा यांनी फेसबुक लाईव्हवरून दिली आणि हा तणाव सध्या तरी संपला आहे.
पंतप्रधान मुबईच्या दौऱ्यावर येत आहेत म्हणून….
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. देशासाठी काम केलेल्या व्यक्तीला यंदापासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा हा पहिला पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना जाहीर झाला आहे. हाच पुरस्कार स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी उद्या (रविवारी) मुंबईत दाखल होणार आहेत. मोदींच्या या दौऱ्याला गालबोट लागू नये किंवा हा दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आमची भूमिका मागे घेत आहोत, असे राणा यांनी म्हटले आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले गंभीर आरोप
एकूणच या विषयावर आणि राज्यातील परिस्थिती बिघडवण्याच्या मुद्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी पत्रकारांशी बोलताना गंभीर आरोप केले. ते म्हणाले कि, नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही कोणीतरी पुढे केलेलं प्यादं आहे, त्यांच्यात एवढी हिंमत नाही. या माध्यमातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून राज्याची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबईत एखाद्या ठिकाणी काही घटना घडली म्हणून संपूर्ण शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडली, असा निष्कर्ष काढणे उचित नाही. भाजपकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी होत आहे. या सगळ्या प्रकरणांचा मूळ हेतू तोच आहे. त्रिपुरात काही घडलं की त्यावरून महाराष्ट्रात दंगल घडवायची, भोंग्यांच्या विषयावरुन समजात अस्वस्थता निर्माण करायची, असे प्रकार भाजपकडून सुरु असल्याचेही दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
हनुमान चालीसा आपल्या घरात वाचावी…
यावेळी त्यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर टीका केली. राणा दाम्पत्याने माझ्यावर केलेल्या टीकेविषयी मला फार काही बोलायचे नाही. मात्र, राणा दाम्पत्याकडून जे काही सुरु केले आहे, ते अनावश्यक आहे. हनुमान चालीसा वाचायची असेल तर त्यांनी ती अमरावती किंवा मुंबईतील घरी बसून वाचावी. त्यासाठी अमुक ठिकाणी जाण्याचा हट्ट का धरला जात आहे? करोना काळातही मंदिरे बंद असल्यावरून भाजपकडून आंदोलने करण्यात आली. या सगळ्याच्या माध्यमातून विरोधी पक्षाला असे दाखवायचे आहे की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित नाही, असा आरोप दिलीप वळसे-पाटील यांनी केला. खासदार किंवा आमदारांनी कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. आपल्यामुळे कुठल्याहीप्रकारचा क्षोभ वाढणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. पण विनाकारण मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन हनुमान चालीसा वाचणे, हा पब्लिसिटी स्टंट असल्याचेही दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले.
भाजपकडून शिवसेनेच्या हिंदुत्वावर वारंवार बोट ठेवलं जात आहे, त्याबद्दल काय वाटतं, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर हिंदुत्व हा दोन पक्षांमधला विषय आहे. त्यावर मी बोलणार नाही, असं गृहमंत्री म्हणाले.
मातोश्रीसमोर शिवसनिकांची प्रचंड गर्दी
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या विरोधात शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. राणा दाम्पत्याला बंटी बबली उपमा देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोघांचा समाचार घेतला. शिवसैनिक मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. राणा दाम्पत्यानं मातोश्रीबाहेर येऊनच दाखवावं, असे आव्हानच शिवसैनिकांनी दिले होते.
आज सकाळी ९ वाजता राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाण्यासाठी निघणार होते. मात्र त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमा झाले. त्यामुळे राणा दाम्पत्याला घराबाहेर पडणे अवघड झाले. खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही आक्रमक भूमिका घेत राणा दाम्पत्य बाहेर येत नाही, तोवर आम्ही त्यांच्या घराबाहेर बसून राहू. त्यांना आम्ही वडापाव खायला घालू. कोल्हापूर मिरचीनं त्यांचं स्वागत करू. राणा दाम्पत्य घराबाहेर आले नाही, तर ते हनुमानाचे बोगस भक्त असल्याचं सिद्ध होईल. दोघांना बाहेर पडू द्या, आम्ही त्यांना योग्य रस्ता दाखवू, असे चतुर्वेदी यांनी राणा दाम्पत्याला यावेळी प्रतिआव्हान दिले.