MaharashtraPoliticalUpdate : ‘माझं बील मी भरलंय, त्यांचं त्यांना विचारा’…..आणि मंत्र्यांच्या कोरोना उपचाराच्या खर्चावर जेंव्हा अजित पवार खवळतात ….!!

पुणे : कोरोनासारख्या भयानक संसर्गाला सर्वच जण सामोरे गेले यात सर्वसामान्य लोकांचा जीव तर अक्षरशः होरपळून गेला. त्यात काही जणांकडे उपचारासाठी पुरेशे पैसे नव्हते तर काही जणांना पैसे असूनही उपचार मिळाले नाही . या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेऊन कोट्यवधींची बिले सरकारी खर्चात लावल्याचे वृत्त बाहेर येताच या मंत्र्यांबद्दल जनतेमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. मात्र याबाबत आपली रोखठोक प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘माझं बील मी भरलंय, त्यांचं त्यांना विचारा’, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
दैनिक दिव्य मराठीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले असून या वृत्तानुसार, कोरोनाकाळातील दोन वर्षात ठाकरे सरकारमधील एकूण १८ मंत्र्यांनी कोरोना काळात खासगी रुग्णालयात उपचार घेतले आणि या उपचारासाठी लागलेला लाखोंचा खर्च सरकारी तिजोरीतून भरला. या १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयातील उपचारासाठी तब्बल १ कोटी ३९ लाख खर्च केले. यात सगळ्यात बील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नावावर आहे. टोपेंनी सरकारी तिजोरीतून तब्बल ३४ लाख रुपये भरल्याची माहिती समोर आली आहे.
…आणि अजित पवार संतापले
“तुम्ही काहीही झालं की यावर तुमचं मत काय म्हणून प्रश्न विचारता. मला मंत्र्यांच्या बिल प्रकरणात एवढंच सांगायचंय, मी कोरोनावर उपचार घेत असताना माझा स्वत:चा पैसा खर्च केला. ज्यांनी खासगी बिलं सरकारीत लावली, त्यांना तुम्ही जाऊन प्रश्न विचारा, स्वत:चा पैसा खर्च करण्याऐवजी सरकारचा पैसा का घेतला, बाबांनो तुम्ही असं का का केलं…?”, अशी कमेंट अजित पवार यांनी दिली.