DhananjayMundeNewsUpdate : धनंजय मुंडे यांना ५ कोटीची खंडणी मागणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांकडून अटक , काय आहे प्रकरण ?

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. एकीकडे त्यांच्या दुसऱ्या कथित पत्नी करुणा मुंडे यांचे त्यांच्याविरोधात राजकारण चालूच असताना एका महिलेकडून त्यांना बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देत पाच कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात येत असल्याची तक्रार धनंजय मुंडे यांनी पोलिसात दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणात रेणू शर्मा या महिलेस इंदुरमधून अटक केली आहे. आता मुंबई पोलीस रेणू शर्माला मुंबईत आणणार आहेत. आता पोलीस रेणू शर्मा हिची चौकशी करतील. या चौकशीतून कोणती नवी माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये धाव घेत सदर महिलेविरुद्ध खंडणी मागीतल्याची आणि ब्लॅकमेलिंग करत असल्याची पुराव्यांसह तक्रार दिली होती. या संबंधी मलबार हील पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
मागील दीड-दोन वर्षांपासून मला हा त्रास सुरू होता, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे रेणू शर्मा या महिलेने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती, त्यानंतर काही दिवसातच तिने सदर तक्रार माघारी घेतली होती. तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हाट्सएप तसेच फोन करून पैश्यांची मागणी करत होती, यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसात दिले असल्याचेही मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
नेमके प्रकरण काय आहे ?
धनंजय मुंडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, रेणू शर्मा हिने यापूर्वीही त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची खोटी तक्रार दाखल केली होती. मात्र, नंतरच्या काळात तिने ही तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रेणू शर्माने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धनंजय मुंडे यांना फोन केला. यावेळी तिने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास तुमची बदनामी करेन, अशी धमकी या रेणू शर्मा हिने धनंजय मुंडे यांना दिली होती.
या धमकीनंतर धनंजय मुंडे यांनी एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तिला तीन लाख रुपये दिले होते. तसेच एक महागडा मोबाईलही पाठवला होता. मात्र, त्यानंतरही या रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याकडे ५ कोटी रुपयांसाठी तगादा लावला होता. ही महिला आपल्या ओळखीची असल्याचे धनंजय मुंडे यांनी तक्रारीत स्पष्ट केले होते.
“पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्री पद जानेकीं नौबत आ गई थी. अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी. अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है ? ” अशा आशयाचा मेसेज रेणू शर्मा हिने धनंजय मुंडे यांना पाठवला होता. याचे पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसांना दिले होते.
कोण आहे रेणू शर्मा?
रेणू शर्मा ही महिला धनंजय मुंडे यांचे नाव लावणाऱ्या आणि त्यांची पत्नी म्हणविणाऱ्या करुणा शर्मा यांची बहीण आहे . त्या मूळच्या मध्य प्रदेशातील इंदौर येथील आहेत. रेणू शर्मा हिच्याविरुद्ध यापूर्वीही ब्लॅकमेलिंगच्या अनेक तक्रारी विविध पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्या होता. धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई गुन्हे शाखा आणि इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक केली. त्यानंतर रेणू शर्मा हिला इंदौर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने रेणू शर्मा हिचा ताबा मुंबई पोलिसांना दिला. यानंतर तिला मुंबईत चौकशीसाठी आणण्यात आले.