GaneshNaikNewsUpdate : बुरे काम का बुरा नतीजा….आ. गणेश नाईक यांना अटक करण्यासाठी पोलिसांची शोध पथके

मुंबई : लिव्ह इन रिलेशन प्रकरणात झालेल्या अपत्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार देऊन पीडितेला जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या अटकेसाठी पोलिसांनी तयारी केली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे त्यांना पोलिसांकडून कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना अटक करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत. कोपरखैरणे येथील घर आणि कार्यालय तसंच मुरबाडमधील फार्म हाऊसवर पोलिसांकडून नाईक यांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे लवकरच पोलिसांकडून त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन चार दिवस लोटल्यानंतरही गणेश नाईक यांना अटक न करण्यात आल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महिला आघाडीने आक्रमक आंदोलन सुरु केले केले असून आमदार नाईक यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
असे आहे प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश नाईक यांच्याविरोधात त्यांच्यासोबत २७ वर्षे लिव्ह इन मध्ये असलेल्या एका महिलेने लैंगिक शोषणाची आणि त्यातून झालेल्या आपट्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार देत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नेरूळ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तक्रारदार महिला १९९३मध्ये वाशी सेक्टर-१७मधील बिग फ्लॅश स्पोर्ट्स क्लब येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. यावेळी नाईक वारंवार क्लबमध्ये बैठकीसाठी येत असत. ओळख झाल्यानंतर ते मला संपर्क करत होते. सन १९९५पासून आमच्यातील मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यावेळी नाईक यांनी मला पारसिक हिल येथील बंगल्यात नेऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले. पुण्यात फिरण्यासाठी गेल्यानंतरही आमच्यामध्ये संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
न्यू जर्सी येथे बाळंतपण
दरम्यान नोव्हेंबर २००६मध्ये गणेश नाईक यांच्यापासून गर्भवती राहिल्यानंतर सहाव्या महिन्यात एप्रिल २००७मध्ये त्यांच्या सांगण्यावरून मी न्यू जर्सी येथे राहण्यास गेले व १८ ऑगस्ट २००७ मध्ये मुलाला जन्म दिला. तो दोन महिन्यांचा असताना नाईक स्वत: मला व मुलाला घेण्यासाठी अमेरिकेला आले होते. त्यानंतर त्यांनी आम्हाला नेरूळमधील सीब्रीज टॉवर इमारतीत राहण्यास नेले. ते आठवड्यातून तीन वेळा घरी येत असत. त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक शोषण केले आणि मुलाचा स्वीकार करण्यास नकार देत जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार या महिलेने केली. त्यानुसार नेरूळ पोलिसांनी गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.