AurangabadNewsUpdate : औरंगाबादची राज ठाकरे यांची सभा वादाच्या भोवऱ्यात , वंचित, राष्ट्रवादीसह पाच पक्ष संघटनांचा विरोध

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणाऱ्या जाहीर सभेला मोठ्या प्रमाणात विरोध असल्यामुळे या जाहीर ससभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे एकीकडे मनसेने त्यांच्या सभेची तयारी सुरू केली असून दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससह पाच संघटनांनी राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी न देण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांनी ज्या प्रमाणे हिजाब गर्ल मुस्कान खान हिच्या औरंगाबादमधील सत्कार सभेला परवानगी नाकारली गेली, तशीच राज ठाकरे यांच्या सभेलाही परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेलने केली आहे.
दरम्यान राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला वंचित बहुजन आघाडी आणि मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहारसह पाच संघटनांनी विरोध केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही सभेला विरोध केला आहे. राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारावी, अशी मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलने केली आहे. रमजानचा महिना सुरू आहे. राज ठाकरेंच्या सभेने जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेलने म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक महामंडळाच्या मैदानावर १ मे रोजी जाहीर सभा घेण्याची घोषणा केली आहे. या जाहीर सभेच्या नियोजनासाठी औरंगाबादमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत औरंगाबाद शहर आणि ग्रामीणमधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले आहेत. बैठकीला मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांची उपस्थित आहेत.