MumbaiNewsUpdate : राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’ चा नारा , घेतला राज्यात सर्वत्र महा आरत्यांचा निर्णय …

मुंबई : ‘हिंदुत्वा’च्या मुद्यावरून मनसेनेते राज ठाकरे यांनी अधिक आक्रमक होण्याचा निर्णय घेत ‘ जय श्रीराम’ चा नारा देऊन येत्या ३ मे रोजी राज्यात सर्वत्र महाआरत्या करण्याचे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थावर बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आक्रमक हिंदुत्वाच्या दिशेनं मार्गदर्शन करीत औरंगाबादची जाहीर सभा , ३ मे रोजी महा आरत्या आणि ५ मे रोजी अयोध्या दौऱ्याबाबत नियोजन करण्याचे आदेश दिले.
दरम्यान राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्यावरून राज्यात सर्वत्र वातावरण तापले असून त्यांनी दिलेल्या ३ मे च्या अल्टिमेटमला उत्तर देताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर पोलीस तयार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी सांगितले आहे . विशेष म्हणजे १ मे रोजी औरंगाबाद येथे होत असलेल्या सभेला आंबेडकरवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला असून पोलिसांनी या सभेला परवानगी दिली तरी सभा उधळण्याचा इशारा रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळेंनी दिला आहे.
दरम्यान औरंगाबादमध्ये जोरदार सभा घ्यायची आहे. या सभेला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी तयारी करा. त्यादृष्टीने नियोजन करा. सभेला परवानगी नाकारली जाईल, अशी कोणतीही कृती करू नका. जे काही उत्तरं द्यायचंय ते मी सभेच्या माध्यमातून देईन, अशी सूचना राज यांनी केली. तसेच मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मेपर्यंतची मुदत दिली आहे. याच दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्यामुळे राज्यभरात महाआरत्यांचं आयोजन करण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी दिले असून राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
याशिवाय घोषित कार्यक्रमाप्रमाणे ५ जूनच्या अयोध्या दौऱ्याबाबत स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली जाणार असून त्याची जबाबदारी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंकडे सोपवण्यात आली आहे. यासाठी १० ते १२ ट्रेन बुक केल्या जाणार आहेत. रेल्वे राज्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार आहे. याशिवाय राज यांच्या सुरक्षेसाठी गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहिण्याचेही या बैठकीत ठरले असल्याचे सांगण्यात येत आहे.