MaharshtraNewsUpdate : राज्य सरकारला भोंग्यांबद्दल अल्टीमेटम देणाऱ्या राज ठाकरेंची औकात काय ? लक्ष्मण माने यांचा सवाल

सातारा : “राज्य सरकारला भोंग्यांबद्दल अल्टीमेटम देणाऱ्या राज ठाकरेंची औकात काय आहे?”, अशा शब्दांमध्ये लक्ष्मण मानेंनी राज यांच्यावर निशाणा साधून राज ठाकरेंचं वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणार असून त्यांच्याविरोधात पोलिसांनी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी केली आहे. दरम्यान “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर प्रसंगी मी स्वत: त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहे,” असा इशाराही लक्ष्मण मानेंनी दिला आहे.
“मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास आम्ही तलवारी काढू, हे राज ठाकरेंचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे. भारतीय दंड विधानाप्रमाणे असं वक्तव्य करणं हा फौजदारी गुन्हा आहे. म्हणूनच पोलिसांनी तात्काळ त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी माने यांनी केली असून पुढे बोलताना माने यांनी, “मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन करतो की त्यांनी आपल्या भावाची (राज ठाकरेंची) समजून काढावी. नाहीतर घटनात्मक विधीमंडळ प्रमुख या नात्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा. याबद्दल मी स्वत: पत्र लिहून तशी विनंती करणार आहे. राज कोणाची तरी सुपारी घेऊन काम करतायत,” असेही म्हटले आहे.
“डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातींचा अभ्यास करुन समन्वय साधणारे भारतीय संविधान तयार केले आहे त्यावर आक्रमण करुन भाजपाने देशात आणि राज्यामध्ये धुडगूस घातलाय, राज ठाकरेंनी केवळ ठाकरे घरण्यात जन्म घेतला आहे. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीमधील एक मोठे नेते होते. त्यांच्या विचारांचा आदर्श वर वारसा राज ठाकरेनी घ्यावा,” असेही माने यांनी म्हटले आहे.
संघाला देशात फाळणीसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे का?
“धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांचा प्रतिकार केला पाहिजे. देशात आणि राज्यामध्ये कायद्याच राज्य आहे. मात्र पंतप्रधान या राजकीय संवेदनशील परिस्थितीवर अवाक्षर काढत नाहीत. त्यांना जरा देखील लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. संघाला देशात फाळणीसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे का?” असा प्रश्नही माने यांनी उपस्थित केला.
माने यांनी पुढे बोलताना म्हणाले कि , ‘आम्ही भारतीय लोक’ नावाचं अभियान महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवणार असल्याचं स्पष्ट केले आहे. या अभियानाला २९ एप्रिलपासून सकाळी ११ वाजल्यापासून साताऱ्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयावरुन एक दिवसीय उपोषण करून सुरुवात केली जाणार आहे, असे सांगून ते म्हणाले कि , “माझ्यावर हल्ला झाला तरी चालेल पण कोणीतरी या बेबंदशाहीला विरोध करायला हवा म्हणून मी या संघर्षात उतरत आहे, असेही माने म्हणाले.