MaharashtraNewsUpdate : राज ठाकरे यांनी ‘या’ दोन घोषणांसाठी आयोजित केली होती पत्रकार परिषद

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ‘मी १ मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनी औरंगाबाद इथं जाहीर सभा घेणार आहे आणि त्यानंतर ५ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे,’ अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान मशिदीवरील भोंग्याचा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला आणि पुन्हा आपला अल्टिमेटम दिला.
या विषयी अधिक बोलताना राज ठाकरे म्हणाले कि , ‘मशिदींवरील भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे. भोंग्यांचा त्रास फक्त हिंदूनाच होतो असं नाही, सर्वांनाच हा त्रास होतो. त्यामुळे जर ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर जशास तसे उत्तर देण्यास देशभरातील हिंदू बांधवांनी तयार राहावं. आम्हाला देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नको आहेत, त्यामुळे तुम्ही शांततेत भोंगे काढून घ्या अन्यथा आम्ही दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवणार,’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे
दरम्यान देशात काही ठिकाणी रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांवेळी घडलेल्या हिंसक घटनांवर बोलताना ते म्हणाले कि , ‘तुमच्या हातात जे शस्त्र आहे ते आमच्या तरुणांच्या हातात द्यायला लावू नका. शोभायात्रांवर होणारे हल्ले थांबवा नाही तर आम्हीही जशास तसं उत्तर देऊ’ . शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘हिंदू ओवेसी’ असे म्हणत राज ठाकरे यांचा समाचार घेतला होता. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, ‘मी आता पुन्हा लवंड्यांवर बोलू इच्छित नाही.’