AurangabadNewsUpdate : एसटी कर्मचारी वसुली प्रकरणात आणखी एकास औरंगाबादेतून अटक

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतलेले असताना सदावर्ते यांच्या पत्नीसह त्यांच्यासोबत या कटात सहभागी असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्याची मोहीमच पोलिसांनी उघडली आहे. याच कारवाई अंतर्गत आणखी एका एसटी कर्मचाऱ्याला अकोला पोलिसांनी औरंगाबादमधून अटक केली आहे. त्याच्यावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. अजय गुजर असे अटक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन ते गुणरत्न सदावर्तेंना दिल्याचा ठपकाही त्याच्यावर आहे. एसटी आंदोलनात सुरुवातीला अजय गुजरचा मोठा सहभाग होता. मात्र सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर गुजरने आंदोलनातून माघार घेतली. पण, आता त्याला पैसे घेतल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. अजय गुजर याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे मागितल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर त्याच्याविरुद्ध अकोला जिल्ह्यातील अकोट येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अकोट शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेर यांच्या पथकाने आज दुपारी सातारा परिसरातून अजय गुजर यास ताब्यात घेतले.