MumbaiNewsUpdate : गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी, आता सातारा पोलिसांना हवाय ताबा …

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावरील हल्ला बोल आंदोलन प्रकरणी गेल्या ४ दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी नाकारीत गिरगाव कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्या न्यायालयीन कोठडीनंतर सातारा पोलीस सदावर्तेंना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. दीड वर्षापूर्वी केलेल्या विधानावरून सदावर्तेंवर गुन्हा दाखल झाला होता. त्यावर कोर्टाने सदावर्तेंना अटक करण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार गिरगाव कोर्टात सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा देण्यासाठी अर्ज केला होता. त्याला कोर्टाने परवानगी देत १७ एप्रिलला पर्यंत ताबा घेण्यास सांगितले आहे.
चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करून आणखी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. यावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने पोलिसांची मागणी अमान्य करीत सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ८० लाख रुपये मिळाल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला. मात्र वारंवार त्याच मुद्द्याच्या आधारे पोलीस कोठडीची मागणी केली जात आहे. आरोपीचा मोबाईल तुमच्या ताब्यातच आहे. हा सगळा तपास भरकटेलेला आहे. आरोपीला पोलीस कोठडी देण्याचे एकही कारण पोलीस सांगू शकत नाही असा युक्तिवाद सदावर्ते यांच्या वकिलांनी केला. दरम्यान याच प्रकरणातील इतर आरोपी आजच्या सुनावणी अभिषेक पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यावर कोर्टाने निर्णय देत १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
न्यायालयात आज काय झाले ?
दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचाही आंदोलनाच्या कटात सहभाग असल्याचा आरोप करून पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी जयश्री पाटील यांना सहआरोपी करण्याची मागणी केली. सदावर्ते यांच्या घराच्या टेरेसवर जी बैठक झाली त्यात जयश्री पाटील उपस्थित होत्या. सदावर्ते यांनी डायरीत पैशाची नोंद ठेवली आहे. त्यात ८० लाख जयश्री पाटील यांना दिल्याचा उल्लेख आहे. ५३० रुपये प्रमाणे १ लाख कर्मचाऱ्यांनी पैसे दिले ते २ कोटीच्या आसपास गेले आहेत सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले. त्यावर सदावर्ते यांच्या वकिलांनी प्रतिवाद करताना सांगितले कि , कुल्याच एसटी कर्मचाऱ्याने पैसे दिल्याबद्दल तक्रार केली नाही मग पैशाचा विषय कसा आला? आरोपीचा मोबाईल तुमच्याच ताब्यात आहे मग कोठडी कशाला? अटक केलेल्या आरोपींच्या नावावर सदावर्तेंची पोलीस कोठडी मागणं चुकीचे आहे. नागपूरचा व्यक्ती कोण आणि त्याचा येथे संबंध काय ?
दरम्यान न्यायालयाने दोन्हीही बाजूंचा युक्तिवाद ऐकून पोलिसांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी अमान्य करीत १४ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीची आदेश दिले त्यामुळे सदावर्ते यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यांच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने सातारा पोलिसांनी आधीच त्यांना ताब्यात देण्यासाठी न्यायालयात अर्ज दिलेला आहे . त्यामुळे त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत.