MumbaiNewsUpdate : देशमुख , राऊत यांच्यापाठोपाठ ईडीकडून नवाब मलिक यांच्याही ९ मालमत्ता जप्त

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख , खा. संजय राऊत यांच्या पाठोपाठ राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने आज मोठी कारवाई करीत त्यांची नवाब मलिकांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये मुंबईतील महत्त्वाची संपत्ती आणि उस्मानाबादेतील १४८ एकर जमिनीचा समावेश आहे. ईडीने संबंधित कारवाई ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या कारवाईत ईडीने नवाब मलिक यांचे कुर्ल्यातील तीन फ्लॅट, बांद्र्यातील दोन फ्लॅट, उस्मानाबाद येथील १४८ एकर शेतजमीनही ताब्यात घेतली आहे. ईडीने मलिकांच्या एकूण ९ जप्त केल्या आहेत. मात्र हि जप्ती तात्पुरत्या स्वरुपाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास ईडी आणि एनआयएकडून सुरु आहे. तसेच नवाब मलिकही सध्या अटकेत आहेत.
याबाबत ईडीने प्रेसनोट जारी केली असून त्यात या कारवाईची माहिती दिली आहे. नवाब मलिक यांनी मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच आर्थिक गैरव्यवहार करुन संबंधित संपत्ती मिळवली आहे. म्हणून या संपत्तीवर जप्ती आणल्याचे ईडीचे म्हणणे आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित जे आर्थिक व्यवहार झाले आहेत त्या व्यवहारातून ही संपत्ती घेतली गेली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंड, कमर्शिअल युनिट, ३ फ्लॅट आणि वांद्रेतील २ फ्लॅट, तसेच उस्मानाबादेतील १४८ एकर शेतजमीनीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मलिक जवळपास ११ कोटी ७० लाख रुपये या संपत्तीमधून कंट्रोल करत होते. त्यांची सॉरीडोस नावाची कंपनी आहे. मलिक इन्फ्रास्ट्रकचरच्या माध्यमातून पैसे देण्यात आले होते. ईडीने चौकशी केली असता संबंधित संपत्ती आणि पैशांचा संबंध हा दाऊदशी संबंधित व्यक्तींसोबत येतोय. तिथून हे सगळे पैसे आले असून त्यातून ही संपत्ती घेतली गेल्याचा दावा आणि आरोप ईडीने केला आहे. मरियम गोवाला नावाच्या महिलेची संपत्ती हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी जप्त केलेल्या संपत्तीविषयी निवडणुकीच्यावेळी प्रतिज्ञापत्रात माहिती दिली होती का ? हे अद्याप तपासलेले नाही.