MaharshtraNewsUpdate : ‘सिल्व्हर ओक’ बंगला हल्ला बोल प्रकरणातील ‘नागपूर कनेक्शन’ अखेर मुंबई पोलिसांच्या ताब्यात …

नागपूर : ‘सिल्व्हर ओक’ बंगला निवासस्थानावरील हल्लाप्रकरणात सातत्याने नागपूर कनेक्शन , नागपूर कनेक्शन असे जे नाव पोलीस घेत होते त्या ‘कनेक्शन’ला अखेर पोलिसांनी नागपुरातून उचलले असून संदीप गोडबोले (रा. जलालखेडा), असे या ‘कनेक्शन’ नाव आहे. विशेष म्हणजे संदीप गोडबोले हि कुणी राजकीय व्यक्ती नसून एसटी कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावरील हल्ल्यापूर्वी एसटी कामगारांचे वकील अॅड गुणरत्न सदार्वेत यांनी व्हॉट्सअॅपवर नागपुरातील व्यक्तीसोबत दोन वेळा संवाद साधल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर हा नागपूकर कोण? याची चर्चा सुरू झाली. मुंबई पोलिसांनी सदार्वेत यांनी व्हॉट्सअॅप कॉल केलेल्या नागपूकराचे लोकेशन शोधले. त्याची माहिती काढली. तो क्रमांक संदीप गोडबोले यांचा असल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांचे पथक नागपुरात आले. मुंबई पोलिसांनी गणेशपेठ पोलिसांच्या मदतील गोडबोले यांना अटक केली. मुंबई पोलिसांचे हे पथक गोडबोले यांना घेऊन बुधवारी रात्री मुंबईकडे रवाना झाले.
सदावर्तेना आता सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यास परवानगी
‘सिल्व्हर ओक’ बंगला निवासस्थानावरील हल्लाप्रकरणात मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश आज गिरगाव न्यायालयाने दिले असल्याचे वृत्त आहे. साता-यातील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांना तपासासाठी ते हवे असल्याने सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा मागितला आहे. दरम्यान सदावर्तेची मुंबई पोलिसांनी आर्थर जेल मध्ये रवानगी केल्याने आता सातारा पोलिसांकडे ताबा उद्या गुरुवारी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
न्यायालयाने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सातारा पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांचा दाखल गुन्ह्यात तपासकामी ताबा मिळावा अशी विनंती गिरगाव न्यायालयाकडे केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य केली असून १७ दिवसाची ट्रान्झिट रिमांड देण्यात आली आहे त्या अंतर्गत सातारा पोलिसांना ताब्यात घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सातारा पोलीसांकडून अॅड. सदावर्ते यांचा उद्या गुरुवारी ताबा घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी साताऱ्यातील काही नेत्यांवर अवमानकारक विधाने केली होती. त्यामुळे त्यांच्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल झाला आहे. चौकशीसाठी सदावर्ते यांचा ताबा देण्याचा न्यायालयाने दिला आहे. सातारा पोलिस सदावर्ते यांचा ताबा घेऊन साताऱ्याला रवाना होतील. दरम्यान सदावर्ते यांना सातारा पोलिसांना चौकशीसाठी किती दिवस द्यायचे याचा निर्णय जिल्हा सत्र न्यायालयात घेईल. न्यायालयीन कोठडीनंतर सदावर्ते यांना जामिनाचा अधिकार प्राप्त होतो पण इतर प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने त्यांना १७ दिवसाची ट्रान्झिट रिमांड देण्यात आली आहे.त्या अंतर्गत आता सातारा पोलिसांकडे आर्थर जेल मधून ताबा उद्या गुरुवारी मिळणार आहे.