MumbaiNewsUpdate : सातारा पोलिसांचाही सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी कोर्टात अर्ज , अकोल्यातही पती -पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी झालेल्या हल्ला बोल आंदोलन प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर दुसऱ्या एका दोन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात तर अकोल्यात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील व अन्य दोन जणांविरुद्ध अकोट शहर पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोला शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. यापैकी साताऱ्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात सदावर्ते यांना ताब्यात देण्यात यावे अशी मागणी सातारा पोलिसांनी केली असून हा अर्ज न्यायालयाने राखून ठेवला आहे.
हे दोन्हीही गुन्हे लक्षात घेता गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. सदावर्ते यांना आज मुंबईत गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी झालेल्या युक्तीवादानंतर त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली. विशेष म्हणजे सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलीसही आज कोर्टात हजर झाले होते. मात्र साताऱ्यात सदावर्तेंच्या विरोधात दाखल झालेला गुन्ह्याचे प्रकरण वेगळे आहे. दरम्यान सदावर्तेंना कोर्टाने आणखी दोन दिवस कोठडी सुनावली असल्याने सातारा पोलिसांचा अर्ज राखून ठेवला आहे.
सातारा येथील दोन वर्षांपूर्वीच्या फिर्यादीची पार्श्वभूमी
सातारा पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार गुणरत्न सदावर्ते यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते . त्यामुळे याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणी चौकशी करण्यासाठी सातारा पोलीस आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांना सदावर्ते यांना ताब्यात घ्यायचे आहे. सातारा पोलीस सदावर्ते यांना कोर्टातूनच ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, साताऱ्यातील गुन्ह्याची स्वरुप अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.
सदावर्ते पती -पत्नीसह अन्य दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
दरम्यान हे प्रकरण उघडकीस येत नाही तोच अकोल्यातही गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील व अन्य दोघांविरुद्ध अकोट शहर पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोला शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
या प्रकरणावर अकोट पोलीस ठाण्याचे अकोट शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरोक्षक प्रकाश अहिरे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. या संपामध्ये सहभागी झाल्यानंतर एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांवर बडतर्फ आणि निलंबन, अशा अनेक कारवाया केल्या होत्या. या कारवायांपासून वाचण्यासाठी औरंगाबाद डेपोचे अजयकुमार गुजर, अकोट आगारातील प्रफुल्ल गावंडे यांच्यामार्फत गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनी ७४ हजार ४०० रुपये अकोट शहरातील कर्मचाऱ्यांचे स्वीकारले होते. तसेच राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून ३ कोटी रुपये भूलथापा देऊन, कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ देणार नाही, असे खोटे आश्वासन देवून या चौघांनी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यांच्याविरोधात आज अकोट शहर पोलीस ठाण्यामध्ये कलम ४२० आणि ४३४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कुणालाही अटक झालेली नाही”, अशी माहिती पोलीस निरोक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली.