MumbaiNewsUpdate : नेमके काय घडले ? संतप्त एसटी कर्मचाऱ्यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर धडक, खा. सुप्रिया सुळे समोर आल्या पण….

आमच्यावर दगडफेक करून किंवा चपला फेकून प्रश्न सुटणार नाहीत. आंदोलकांनी शांततेने चर्चा करावी, मी या क्षणी तुमच्याशी बोलायला तयार आहे. माझे आई-वडील आणि मुलगी घरात आहे. प्रथम त्यांच्या सुरक्षिततेची मला खात्री करू द्या. यानंतर मी एसटी आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहे : सुप्रिया सुळे
मुंबई : मुंबई न्यायालयाच्या निकालानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी आज आक्रमक पवित्र घेत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर आपला मोर्चा वळवून निदर्शने केली. दरम्यान मी बोलायला तयार आहे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे मोर्चेकऱ्याना सामोरे गेल्या खऱ्या पण त्यांच्याशी चर्चा करायला कोणीही तयार नव्हते त्यामुळे आंदोलकांचा गोंधळ कमी झाला नाही परिणामी सुप्रिया सुळे यांना आपल्या निववासस्थानात परतावे लागले.
एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. आंदोलकांनी थेट सिल्वर ओकला लक्ष्य केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला. यावेळी, मी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे… मी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे…मी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे…आपण शांतेत चर्चा करुयात असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी वारंवार केले. मात्र, त्यांच्या आवाहनाला आंदोलकांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर हताश झालेल्या सुप्रिया सुळे पुन्हा माघारी फिरल्या.
एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने अचानक सिल्वर ओकवर दगडफेक, चप्पलफेक झाली तेव्हा शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या कन्या घरात असल्याची माहिती आहे. आंदोलक थेट घराच्या दरवाज्याजवळ पोहचल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. या प्रकरणात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे आंदोलन अचानक कसे झाले असा प्रश्न उपस्थित करून यामागे असलेल्या अज्ञात शक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हायकोर्टाने काय म्हटले आहे ?
एसटी संपाविरोधातील महामंडळाच्या याचिकेसह इतर सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठनं दिलेल्या 26 पानी निकालाची प्रत शुक्रवारी दुपारी जारी करण्यात आली. हायकोर्टानं दिलेल्या अल्टिमेटमनुसार सर्व कामगारांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं, तोवर कामावर न परतणा-या कामगारांवर कोणतीही कारवाई करू नये. संपात भाग घेतला म्हणून महामंडळानं कोणतीही शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावर करू नये. जर या कारणासाठी कामगारांवर कारवाई आधीच काही कारवाई केली असेल तर ती रद्द करण्यात यावी. ज्या कामगारांना यासाठी कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आल्या होत्या त्यांनासुद्धा कारवाईतून दिलासा देण्यात यावा असे निर्देश देत एसटी महामंडळ यापुढे कोणतीही फौजदारी कारवाई कामगारांवर करणार नाही, असा विश्वास हायकोर्टानं व्यक्त केला आहे.
कायदा हातात घेऊ नका : दिलीप वळसेपाटील
या आंदोलनाचे वृत्त समजताच गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी म्हटले आहे कि , एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत. आंदोलनाला अनिष्ट वळण देऊन कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, असे आंदोलकांना नम्र आवाहन आहे.
पवारांच्या घरावर जाणं निंदनीय : छगन भुजबळ
यावर आपली प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले कि , एस टी कर्मचाऱ्यांना विनंती करायची आहे, गेली कित्येक महिने आपण संपावर आहेत आपल्या जवळपास सर्व मागण्या मंजूर केल्या. हायकोर्टाने प्रत्येकवेळा तुम्हाला सांगितलं काही मार्ग सुचवलं एवढं सगळं झाल्यानंतर पवार साहेबांच्या घरावर जाण्याचा काही कारण नव्हतं. एवढ्या सगळ्या लोकांना पर्मनंट करणं शक्य नव्हतं हे हायकोर्टाने नेमलेल्या समितीने सांगितलेलं होत ते कामगारांना ही मान्य होतं. एवढा पगार दिला तर विकासकामांना एक रुपयाही शिल्लक राहणार नाही. तरीही पैसे वाढवून दिले. मात्र तरीही अशाप्रकारे पवार साहेबांच्या घरावर जाणं निंदनीय आहे. यांचे बोलविते धनी हे वेगळे असण्याची शक्यता आहे. पवार साहेबांच्या अंगावर जाणं योग्य नाही.
शरद पवारांनी आश्वासन पाळले नाही म्हणून कर्मचारी आक्रमक : प्रवीण दरेकर
दरम्यान भाजपनेते प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , एसटी कर्मचाऱ्यांना गेली पाच महिने दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. लढू किंवा मरू या स्थितीत कर्मचारी असल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत .या सगळ्या परिस्थितीला महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे. पवार साहेब यांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत आश्वासन दिले होते . मात्र ते आश्वासन पाळले गेले नसल्याने एसटी कर्मचारी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा पवार साहेब यांच्या घरी गेले असतील.
राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न : खा. संजय राऊत
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य झाल्या असतानाही कुठली तरी अज्ञात शक्ती त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला केला आहे. एसटी संपाच्याबाबतीत सरकारने मार्ग काढण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या. न्यायालयाचा निर्णयही त्याच पद्धतीने लागला. त्यानंतरही कुठलीतरी एक अज्ञात शक्ती वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. शरद पवार यांच्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या नेत्याच्या घरावर हल्ला होणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सुप्रिया सुळे या आंदोलकांना निर्भयपणे सामोऱ्या गेल्या. त्यांनी चर्चा करण्याची तयारीही दाखवली. मात्र, समोरून ज्या प्रकारची भाषा आणि वर्तन सुरु होत, त्यावरून या आंदोलनाचे नेते कोण आहेत, त्यांचे संस्कार तपासावे लागतील. महाराष्ट्रात अशा आंदोलनांना स्थान असता कामा नये, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.