IndiaNewsUpdate : कोणी निंदा अथवा वंदा , मोदीसरकार आणखी एक बँक विकण्याच्या तयारीत …

नवी दिल्ली : कोणी कितीही टीका केली काय आणि आणि विरोध केला काय ? मोदी सरकारकडून भारत सरकारच्या मालकीच्या अनेक सरकारी संस्थांचे खासगीकरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच आयुर्विमा , एलआयसी मधील एक मोठा हिस्सा विकण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर आता सरकारने आयडीबीआय बँकेचेही आधीच घोषित केल्याप्रमाणे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याची प्रक्रिया सुरू होणार असून, मे महिन्यापर्यंत अनेक महत्वाची अपडेट समोर येऊ शकतात.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी २०२१ च्या अर्थसंकल्पात आयडीबीआय बँकेसह अजून दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. पण, कोरोना संसर्गामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती आता कोरोनाचा जोर ओसरताच ही प्रक्रिया सुरू होणार आहे. सरकारला चांगल्या किमतीवर ही बँक विकायची आहे, त्यामुळे आतापासूनच याच्या व्हॅल्यूएशनवर काम सुरू करण्यात आले आहे.
या प्रकरणी उपलब्ध माहितीनुसार, सरकार मे महिन्यात बिड्स म्हणजेच एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट आमंत्रित करण्याचा विचार करत आहे. सध्या आयडीबीआय बँकेमध्ये भारत सरकारचा ४५.४८% आणि भारतीय जीवन बीमा निगमचा ४९.२४% वाटा आहे. यानुसार, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आयडीबीआय मध्ये सरकारचा ९४% पेक्षा अधिकचा वाटा आहे. सध्या एलआयसी आयडीबीआयची प्रमोटर असून, बँकेचे मॅनेजमेंट कंट्रोलही त्यांच्याकडे आहे. सरकार आयडीबीआय बँकेतील आपला संपूर्ण ४५.४८ टक्के वाटा विकण्याच्या तयारीत आहे. एलआयसीच्या बोर्डाने एक प्रस्ताव पास केला आहे, ज्यानुसार तेदेखील बँकेतील आपला वाटा कमी करू शकतात.