WorldNewsUpdate : दुनिया : पाकिस्तानात राजकीय घमासान जारी, विरोधकांच्या बहुमतात वाढ , इम्रान म्हणतात जीवाला धोका …

इस्लामाबाद : पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गटाचे प्रमुख शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, इम्रान खान ज्या पद्धतीने वागत आहेत, ते धक्कादायक आहे. इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर शाहबाज हे पुढील पंतप्रधान असतील, असे मानले जात आहे. दरम्यान इम्रान खान पाकिस्तानमध्ये वेळेपूर्वी निवडणुका जाहीर करू शकतात, असे संकेत दिले जात आहेत.
दरम्यान इम्रान यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचे अकल्पनीय नुकसान झाल्याने पाकिस्तानचे जागतिक हित धोक्यात आले असल्याचे पाकिस्तानचे विरोधी पक्ष नेते शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे तर परकीय षड्यंत्रामुळे (अमेरिकेची भूमिका) आपल्याला सत्तेतून बेदखल करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. अफगाणिस्तानमधील दहशतवादाविरोधातील युद्धात अमेरिकेने पाकिस्तानच्या योगदानाला महत्त्व दिले नाही, असा आरोपही इम्रानने केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांनी सांगितले की, इम्रान खान यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये बहुमत गमावले असून लवकरच शाहबाज शरीफ यांची वर्णी लागणार आहे. ते देशाचे नवे पंतप्रधान असतील. इम्रान खान यांच्याकडे आता कोणताही पर्याय उरलेला नाही.
विरोधकांकडे आणखी बहुमत वाढले
यापूर्वी, सत्ताधारी तेहरीक-ए-इन्साफ पक्षाला आणखी एक धक्का तेंव्हा बसला जेव्हा एमक्यूएम-पीने सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि विरोधकांशी हातमिळवणी केली. त्यांनी इम्रानविरोधातील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 7 जागांची भर पडल्याने विरोधी आघाडीला 177 जागा मिळाल्या आहेत, ज्या बहुमतापेक्षा पाच जास्त आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यापासून अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. इम्रान खान यांनी नुकताच रशियाचा दौरा केला, त्यावेळी व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केली होती. त्यामुळेही अमेरिका पाकिस्तानवर नाराज असल्याचे बोलले जात आहे परंतु अमेरिकेने पाकिस्तानातील राजकारणाशी त्यांचा कुठलाही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
इम्रान खान यांचे म्हणणे असे आहे…
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांच्या जीवाला धोका असल्याची विश्वसनीय माहिती आहे. तथापि, त्यांनी ठामपणे सांगितले की ते घाबरले नाहीत आणि स्वतंत्र आणि लोकशाही पाकिस्तानसाठी आपला लढा सुरूच ठेवतील. रविवारी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी इम्रान यांनी ‘एआरवाय’ न्यूजला सांगितले की, बलाढ्य लष्कराने त्यांना तीन पर्याय दिले आहेत – अविश्वास प्रस्तावावरील मतदानाला सामोरे जाणे, पंतप्रधानपदाचा राजीनामा देणे किंवा मुदतपूर्व निवडणूक घेणे . ते म्हणाले कि , केवळ आपला जीव धोक्यात नाही, तर परकीय शक्तींच्या हातचे बाहुले झालेले विरोधक त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे चारित्र्य हननही करू शकतात. “जर आम्ही टिकलो (अविश्वास ठरावावर मतदान) तर आम्ही दलबदलू लोकांसोबत काम करणार नाही. या परिस्थितीत मुदतपूर्व निवडणूक हाच मला एक पर्याय वाटतो. “मी माझ्या देशवासियांना विनंती करेन की मला साधे बहुमत द्यावे जेणेकरून मला तडजोड करावी लागणार नाही,” असेही खान म्हणाले.
मला ऑगस्ट पासूनच याची माहिती होती
विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला षड्यंत्र असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी ऑगस्टपासून मला याची माहिती होती आणि काही विरोधी नेते दूतावासात फेऱ्या मारत असल्याची माहिती त्यांच्याकडे होती. हुसैन हक्कानी सारखे लोक इंग्लंडला जाऊन पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेत होते. ARY न्यूजच्या बातमीनुसार, खान म्हणाले की, त्यांच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणावर परदेशी देशांनी आक्षेप घेतला आहे. याआधी पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी शुक्रवारी दावा केला की, सुरक्षा यंत्रणांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती दिली होती. डॉन वृत्तपत्राने चौधरी यांच्या हवाल्याने म्हटले आहे. या अहवालानंतर सरकारच्या निर्णयानुसार खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
आठवड्यापूर्वी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते फैसल वावडा यांनीही असाच दावा केला होता. खान यांनी देश विकण्यास नकार दिल्याने त्यांना मारण्याचा कट रचला जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. खान यांच्या जीवाला धोका असल्याचे वावडा म्हणाले होते. वावडा यांनी असेही सांगितले की खान यांना 27 मार्चच्या रॅलीच्या मंचासमोर बुलेटप्रूफ काच लावण्याची गरज असल्याचे अनेक वेळा सांगण्यात आले होते परंतु त्यांनी नकार दिला होता.