CrimeNewsUpdate : अवैध धंदे चालविणारेच जेंव्हा पोलीस अधिकाऱ्यावर संतापतात …. !!

जगदीश कस्तुरे । औरंगाबाद
कोणत्याही शहरातील अवैध धंद्याच्या कारवाईवरील बातम्या आपण वाचतो. खरे तर हे अवैध धंदे अचानक सुरु होत नाहीत तर वर्षानुवर्षे सुरूच असतात आणि त्यावरील कारवायासुद्धा सुरूच असतात. पोलीस आणि अवैध धंधे करणारांचा हा खेळ चालूच असतो पण बऱ्याचदा यावरून शहरात नवीन अधिकारी आला कि , त्याच्या कार्यक्षमतेसाठी त्यालाही आपली ओळख निर्माण करायची असते आणि कामगिरीची नोंदही करायची असते. पण खरे त्याच्याआधीपासून विविध पोलीस ठाण्यात कार्यरत अधिकारी, कर्मचारी आणि त्या त्या हद्दीतील अवैध धंदे चालवणारे लोक यांच्यात नाही म्हटले तरी सलोख्याचे संबंध असतातच …
कालही त्याचाच प्रत्यय आला …. कि , शहरातील एका पोलीस ठाण्याच्या हदीत अवैध रिफिलिंगचा अवैध अड्डा सुरु होता. याबाबतची माहिती आपल्या कर्मचाऱ्यांकडून मिळताच त्या विभागात नव्याने मुबईहून आलेल्या नवीन साहेबांनी अवैध गॅस रिफिलिंग्जवर कारवाई केली आणि या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर तीन आरोपींना अटकही झाली. अर्थात या कारवाईमुळे अड्डयाचा मालक संतप्त झाला. त्याचे पर्यवसान दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वादात झाले. पण जे व्हायचे ते होऊन गेले होते.
हे असे चालूच असते …
त्याचे झाले असे कि , लोटाकारंजा भागातगेल्या अनेक दिवसांपासून गॅस रिफिलिंगचा अवैध अड्डा सुरु होता त्या ठिकाणी रिफिलिंग चालकाने ५/६ लाखांचे साहित्यही आणून ठेवले होते. हि बाब गुन्हेशाखेच्या नजरेतून सुटली तर नवलच …पण चालू होता हा अड्डा … दरम्यान पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयांनी या अड्ड्याच्या चालकावर कारवाई केल्या नंतर रिफिलिंग चालकाचे डोके सरकले आणि पोलिस ठा ण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावरच त्याने चढाई केली. त्यावर त्यांनी नवीन साहेबांकडे बोट दाखवले. त्यानंतर रिफीलिंग वाला चडफडत निघून गेला मग अधिकाऱ्यांमध्ये जे संवाद झाले त्याने कर्मचाऱ्यांचे चांगलेच मनोरंजन झाले . अखेर या प्रकरणात कागदोपत्री सर्व सोपस्कार झाल्यानंतर सगळे पोलीस नेहमीप्रमाणे पुन्हा आपापल्या कामाला लागले .
दरम्यान या कारवाईत जवळपास ६०/७० गॅस च्या विविध कंपन्याच्या टाक्या , इंडक्शन मोटर, वजन काटे असा ५ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई करणाऱयांची नावे झोकात माध्यमांना देण्यात आली..असे हे चालूच असते कारण अशा कारवायांमुळे न पोलीस थांबतात ना कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे करणारे थांबतात ना या कारवायांच्या बातम्या देणारी प्रसिद्धी माध्यमे थांबतात.
कोणत्याच शहरात असे कोणतेही पोलीस ठाणे नाही कि , ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे चालत नाहीत आणि त्याची माहिती पोलिसांना नसते . फक्त त्या ठिकाणी आलेल्या नवीन साहेबांना याची माहिती नसते आणि जेंव्हा त्यांना याची माहिती मिळते तेंव्हा ते अशा अवैध धंद्यावर आवर्जून कारवाई करतात आणि अशा या कारवाया चालूच असतात …फक्त वरिष्ठांना त्या माहित नसतात आणि समजा असे काही चालू असल्याचे माहित झालेच तर यात सहभागी अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई होते पण माहित झाले तर…!! शेवटी या व्यवस्थेला कोण आवरणार हा मोठा प्रश्न आहे. अर्थात लाचखोरी आणि हप्तेखोरीच्या आरोपातून मंत्र्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांचेच हात काळे झाल्याचे महाराष्ट्र पाहात आहे तेथे या लहानांची काय कथा ?