Maharashtra Weather Update : देशभर उष्णतेची तीव्र लाट , विदर्भात दक्षतेचा इशारा

मुंबई : मार्च महिन्यात शेवटच्या चार दिवसांत विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांतील कमाल तापमानाचा पारा ४१ ते ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाची तीव्रता सध्या कमी झाली आहे. त्यामुळे संभाव्य ‘असनी’ चक्रीवादळाचा धोका कमी झाला असला तरी बंगालच्या उपसागरात नैऋत्य वारे सक्रिय झाले असल्याने येत्या चोवीस तासात हे वारे ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये जाऊन धडकणार आहेत. त्यामुळे पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असून हवामान खात्याने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने वाळविलेल्या अंदाजानुसार आज पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील बहुतांशी भागात वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वेग ताशी २५ ते ३५ किलोमीटर प्रतितास इतका राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर २८ ते २९ मार्च दरम्यान राजस्थानातील उत्तरेकडील काही भागात धुळीचे वारे वाहणार आहे. या वाऱ्यांचा वेग सुद्धा ताशी २५ ते ३५ किलोमीटर इतका राहण्याची शक्यता आहे. तर कर्नाटकातील काही भागात तुरळक ठिकाणी आज मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Heat Wave conditions Forecast:
♦ Fresh Heat Wave Spell likely to commence in isolated pockets over West Rajasthan from 27th March, 2022 and extends gradually eastwards during subsequent 4 days.— India Meteorological Department (@Indiametdept) March 26, 2022
दरम्यान एकीकडे देशातील अनेक भागात वेगवान वारे वाहणार असले तरी काही भागात उष्णतेचा चटका वाढणार आहे. आज आणि उद्या गुजरातसह हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी उष्णतेची लाट धडकणार आहे. तर मार्च एंडला विदर्भासह पश्चिम राजस्थान, दक्षिण हरियाणा, पश्चिम मध्य प्रदेशात सूर्य आग ओकणार आहे.२८ ते ३० मार्च दरम्यान संबंधित ठिकाणी सलग तीन दिवस उष्णतेची लाट धडकणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दुपारी उन्हात घराबाहेर न पडण्याचा आणि दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देखील हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.