MaharashtraHealthUpdate : अखेर राज्याच्या आरोग्य विभागानेच ‘त्या’ किटमधील ‘रबरी लिंगा’बद्दल दिले हे कारण….

मुंबई : राज्यात वाढत्या लोकसंख्येला आळा बसावा आणि विशेषकरून महिलांमध्ये त्यासंदर्भात जागृती व्हावी या उद्देशाने राज्यातील आशा वर्कर्सना देण्यात आलेल्या आरोग्यविषयक किट्स मध्ये रबरी लिंगाचा समावेश असल्याची अधिकृत माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत ट्वीट करून त्यात म्हटले होते कि , ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? आशांचे हक्काचे करोना काळात ठरलेले ३५/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट दररोज ओसरली असली तरी ती देण्यात आलेली नाही.’
याबाबत आरोग्य विभागाने म्हटले आहे कि , “राज्यामध्ये कुटुंब कल्याणाच्या ज्या पद्धती आहेत त्यांचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे. कोणत्याही पद्धतीचा वापर करण्याआधी त्याआधी त्याची सविस्तर माहिती शास्त्रीय आधारावर प्रत्येक लाभार्थ्याला माहिती असणे आवश्यक आहे. प्रात्यक्षिकासह हि माहिती दिली तर त्याची परिणामकारकता जास्त चांगल्या पद्धतीने होते. सरकारतर्फे दिलेले किट आशा कर्मचारी आणि आरोग्य संस्थाना देण्यात येणार आहे. २५ हजार आशा कर्मचाऱ्यांपर्यंत हे किट पोहचवण्यात आले आहे. या किटमध्ये कुटुंब कल्याणाच्या वापरायच्या गोष्टींचे मॉडेल आहेत,” असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..??
उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा…आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले ३५/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून….
थोडी लाज ठेवामेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका..@CMOMaharashtra @rajeshtope11 https://t.co/5nnFV9RSuP
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) March 19, 2022
आरोग्य विभागाने पुढे म्हटले आहे कि , “याच्यामध्ये अडचण येण्यासारखे काही नाही. कारण ही सर्व शास्त्रीय माहिती आहे. यामध्ये योग्य जोडप्याला कशाबद्दलची अडचण आहे याच्या खोलात जाणे अपेक्षित आहे. आरोग्याबद्दलची सर्व शास्त्रीय माहिती यंत्रणेतील सर्वांना माहिती असणे अपेक्षित आहे आणि तसेच ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हेही अपेक्षित आहे. त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांनीही याचा वेगळ्या पद्धतीने विचार करु नये. तसेच इतरांनीही यामध्ये वेगळा विचार करण्याचे कारण नाही. हे कुटुंब कल्याण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचे किट आहे. यामधून कोणतेही वेगळे अर्थ काढले जावू नये.”
तृप्ती देसाई यांचा मात्र या निर्णयाला पाठिंबा
दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मात्र या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. “लोकसंख्या ही राज्य सरकारसमोरची एक मोठी समस्या आहे. म्हणूनच राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जे कीट आशा वर्कर्सना समुपदेशनासाठी दिलेलं आहे, त्यामध्ये रबरी लिंग दिलेलं आहे. ते प्रात्यक्षिकासाठी देण्यात आलं आहे. पण त्याला प्रचंड विरोध होत आहे. पण या रबरी लिंगाचे प्रात्यक्षिक दाखवणे, अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात खरोखरच कुटुंब नियोजनासाठी प्रबोधन करायचे असेल तर आशा वर्कर्सनीही अशी संकुचित मानसिकता न ठेवता हे रबरी लिंग आणि ज्या सगळ्या वस्तू आहे, ते घेऊन पुढाकार घेतला पाहिजे. आता हे लिंग घेऊन महिलांसमोर कसे जाऊ, त्यांना ते कसे दाखवू हा विचार बाजूला ठेवला पाहिजे. राज्य सरकारने आपल्या कीटमध्ये रबरी लिंग देऊन कोणतीही चूक केलेली नाही,” असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे .