MaharashtraNewsUpdate : अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी निघालेल्या तहसीलदारांच्या गाडीला अपघात , नायब तहसीलदार ठार

बीड : बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली कारवाईसाठी जात असताना भरारी पथकाच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात नायब तहसीलदाराचा जागीच मृत्यू झाला तर तहसीलदार गंभीर जखमी झाले आहेत.गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवर असणाऱ्या, सावळेश्वर फाट्यावर पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. नितीन जाधव असे अपघातात मृत्यू झालेल्या नायब तहसीलदारांचे नाव आहे. तर बीडचे प्रभारी तहसीलदार असणारे सुरेंद्र डोके हे जखमी झाले आहेत.
याविषयीची अधिक माहिती अशी कि , रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास तहसीलदार व मंडल अधिकारी तथा नायब तहसीलदार भरारी पथकाद्वारे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी जात असताना भरधाव वेगात जाणारी ब्रेझा गाडी सावळेश्वर फाटा येथे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात रस्त्याच्या खाली जाऊन झाडाला धडकली. यामध्ये मंडळाधिकारी नितीन जाधव हे जागीच ठार झाले. तर तहसीलदार सुरेंद्र डोके हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नदीत बुडून दोघांचा मृत्यू
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात हिवरा येथे पोहायला गेलेले चार युवक नदीत बुडाल्याचे वृत्त आहे. रुतीक नरेश पोखळे ( २१ वर्ष ), संघर्ष चंदुजी लढे (१६ वर्ष ) यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर रणजित रामजी धाबर्डे (२८ वर्ष), शुभम सुधारकर लढे (२६ ) यांना नागरिकांनी पाण्याबाहेर काढून प्राण वाचवले. आज दुपारच्या सुमारास दुचाकीने आजनसरा येथून पिपरी येथील रुतीक नरेश पोकळे, संघर्ष चंदुजी लढे, रणजित रामजी धाबर्डे आणि शुभम सुधारकर लढे हे हिवरा येथील वर्धा नदीत पोहायला गेले होते.