#NoToWar : “नो टू वॉर” म्हणत लाईव्ह शोमध्ये कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

रशियाच्या युक्रेनविरुद्धचा आज नववा दिवस असून या युद्धाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. यावर रशियातही टीका होतांना दिसत आहे. पुतीन यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या काही आंदोलकांना रशियात अटक देखील करण्यात आली होती. आता या युद्धाचा निषेध करत एका रशियन वृत्तवाहिनीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी “नो टू वॉर” म्हणत राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे हा राजीनामा त्यांनी लाईव्ह असलेल्या ऑन एअर शोमध्ये दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रशियन रूसी या वृत्तवाहिनीवर लाईव्ह शोमध्ये ‘नो टू वॉर’ म्हणत अँकरने राजीनामा दिला आणि यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी राजीनामा देऊन स्टुडिओतून बाहेर पडले. रशियन अधिकाऱ्यांनी रशियन टीव्ही चॅनेल ‘टीव्ही रेन’ला युद्धाचे कव्हरेज दाखवण्यापासून रोखल्यानंतर ही घटना समोर आली आहे. वाहिनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी शो अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. या टीव्ही चॅनेल कर्माऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्यानंतर स्वान लेक बॅले डांन्सचा व्हिडिओ प्ले केला गेला. १९९१ मध्ये सोव्हिएत युनियन तुटल्यानंतर हा व्हिडिओ रशियाच्या सरकारी टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आला होता.
१५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद
दरम्यान, शुक्रवारी रशियामध्ये एक नवीन कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार लष्कराच्या विरोधात खोट्या बातम्या देणे किंवा प्रसारित केल्यास १५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली होती. शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही या कायद्यावर स्वाक्षरी केली.