ModiPuneVisit : काम झालेले नसतानाही होत आहे उद्घाटन…

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. ते महापालिकेतून कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आणि मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत. त्यानंतर जवळील मोकळ्या मैदानावरून जाहीर कार्यक्रमाद्वारे ते पुणेकरांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या हस्ते या दोन मेट्रो मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर सोमवारपासून या मार्गांवरील मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच त्यांच्या पुणे दौऱ्यापासून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार असून राजकीय रणधुमाळी रंगणार आहे.
काम झालेले नसतानाही उद्घाटन होत आहे…
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जानेवारीमध्ये पिंपरी-चिंचवडला येऊन मेट्रो स्थानकांची पाहणी करून मेट्रोतून प्रवासही केला होता. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावरुन शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देशाचे पंतप्रधान उद्या या ठिकाणी येत आहेत. त्यांचे काही कार्यक्रम होत असतील तर तक्रार करण्याचे कारण नाही. मेट्रो रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. एका महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवण्यासाठी नेले होते. जेथून मेट्रो धावणार आहे तेथून मी प्रवासही केला. त्यावेळी मेट्रोचे काम झालेले नाही हे माझ्या लक्षात आले. काम झालेले नसतानाही उद्घाटन होत आहे. माझी त्याबद्दल काही तक्रार नाही. पंतप्रधान मोदी नदी सुधारणाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. नदीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. पण सुधारणेचा कार्यक्रम मर्यादित ठेवतात आणि आजूबाजूला सोईसुविधा करतात. मी इंजिनियर नाही पण वर किती धरणे आहेत हे मला माहिती आहे. उद्या एखाद्यावेळेस वर ढगफुटी झाली आणि नदीचे पात्र कमी केले तर त्याचे पाणी कुठे जाईल याची माझ्यासारख्यांना चिंता आहे. पंतप्रधान येत आहेत म्हणजे त्यांनी विचार केला असेल, असे मी समजतो. पण संकट आले तर याचा फटका आजूबाजूच्या गावांना बसेल याची काळजी मला आहे,” असे हि शरद पवार म्हणाले.
मोदींच्या हस्ते उद्या या मार्गांचे उद्घाटन :
त्यातील एक मार्ग वनाझ ते रामवाडी या दरम्यानचा आहे. हा मार्ग १३किलोमीटरचा असून त्यापैकी वनाझ ते गरवारे हा पाच किलोमीटरचा मार्ग तयार झाला आहे, त्याचे उद्या उद्घाटन होत आहे. तर दुसरा मार्ग पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट. हा मार्ग १२ किलोमीटरचा असून त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सात किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उद्या मोदी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या मार्गाचेही उद्घाटन करणार आहेत.
पुणे मेट्रोचे उद्घाटन हे रविवारी (६ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालयाच्या मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन (कोथरूड) पर्यंत होणार आहे. त्यामुळे कर्वे रस्ता आणि पौड रस्ता सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे यांनी याबाबतच्या सूचना जाहीर केल्या आहेत. या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. तसेच कर्वे रोडवर खंडूजी बाबा चौक (डेक्कन) ते शिवतीर्थनगर (कोथरूड) पर्यंतच्या रस्त्यावर कोणत्याही वाहनाला जाण्यास परवानगी नसणार आहे.
लोक या पर्यायी रस्त्यांचा वापर करू शकतात :
कोथरूडकडे जाण्यासाठी, लोक अलका टॉकीज चौक-लाल बहादूर शास्त्री रोड-सेनादत्त चौक किंवा दांडेकर पुलाचा वापर करून डीपी रोड-गुळवणी महाराज रोड-कर्वे रोडवरील करिश्मा सोसायटीपर्यंत जाऊ शकतात.
तसेच शिवतीर्थनगर ते खंडूजी बाबा चौकाकडे कोणत्याही वाहनाला परवानगी दिली जाणार नाही.लोक या पर्यायी रस्त्यांचा वापर करू शकतात :
शिवतीर्थनगर-मयूर कॉलनी-हुतात्मा चौक-निंबाळकर बाग-डीपी रोड/गुळवणी महाराज रोड-रिव्हरसाइड रोड ते डेक्कन किंवा सेनादत्त चौक लाल बहादूर शास्त्री रोड या पर्यायी रस्त्यांचा वापर लोक करू शकतात. शिवतीर्थ नगर येथून डेक्कन परिसरात येणारी वाहने मयूर कॉलनी येथे वळविण्यात येणार आहेत.
या दौऱ्याची शुक्रवारी रंगीत तालीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची शुक्रवारी रंगीत तालीम घेण्यात आली. पंतप्रधान मोदी लोहगाव विमानतळावरून ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरने जाणार आहेत, त्या ठिकाणी प्रत्यक्ष हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. तसेच ऐन वेळी हेलिकॉप्टरने प्रवास टाळल्यास रस्त्याने जाण्याच्या ठिकाणापर्यंतची आणि पुणे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या मार्गावर मेट्रोची रंगीत तालीम घेण्यात आली. केंद्रीय सुरक्षा पथक, पुणे पोलीस, जिल्हा प्रशासन, पुणे मेट्रो आणि संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित होते.