RussiaUkrainWarUpdate : रशियाच्या पहिल्या दिवसाच्या हल्ल्यात युक्रेनने गमावले १३७ सैनिक आणि नागरिक

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी १३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले की, आज आम्ही आमचे १३७ वीर आणि आमचे नागरिक गमावले असून ३१६ जण जखमी झाले आहेत. दरम्यान या युद्धात कोणाचीही साथ न मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, त्यांचा देश रशियाशी लढण्यासाठी बाकी आहे. ते म्हणाले, “आमच्यासोबत लढाईसाठी कोण उभे आहे? मला तर कोणीही दिसत नाही. युक्रेनला नाटो सदस्यत्वाची हमी द्यायला कोण तयार आहे? सगळे घाबरले आहेत.”
दरम्यान राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी त्यांच्या व्हिडिओ संदेशात राजधानी कीवमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की , रशियन सैनिकांचे समूह राजधानी कीवमध्ये घुसले. अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांनी सतर्क राहून कर्फ्यूचे पालन करावे. याशिवाय राष्ट्रपती म्हणाले की, रशियाचे लक्ष्य क्रमांक एक आपण असलो तरी ते आणि त्यांचे कुटुंब युक्रेनमध्येच राहतील.
रशियाने दावा केला आहे की हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी युक्रेनमधील ७० हून अधिक लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. या हल्ल्यामुळे युक्रेनमधील लोकांना घरे सोडून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास भाग पाडले जात आहे. वास्तविक काल रशियाने संपूर्ण सैन्यबळासह युक्रेनवर हल्ला केला आहे. ब्रिटन (यूके) आणि अमेरिका (यूएस) सह अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि त्याचे गंभीर परिणाम होण्याचा इशाराही दिला. परंतु या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरून होणार निषेध आणि निर्बंधांकडे दुर्लक्ष करून, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे की, रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास यापूर्वी त्यांनी कधीही पाहिलेले नसतील असे परिणाम होतील. असा थेट इशारा पुतिन यांनी नाटो सैन्य आणि अमेरिकेला हा इशारा दिला आहे.