MaharahtraPoliticalUpdate : राज्यात सत्ता बदलासाठी आता भाजप नेत्यांकडून एप्रिलचे संकेतआणि आठवलेंचीही कोटी !!

मुंबई : राज्यात भाजपशी काडीमोड करीत गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले असले तरी भाजपकडून सातत्याने सरकार पाडण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. दरम्यान आज शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित एका सोहळ्यातही याच विषयावरून पुन्हा एकदा राज्यातील बदलाचे भाष्य करण्यात आले. विशेष म्हणजे या सर्व राजकारणात आता राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही शिवजयंतीच्या कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राज्याच्या सत्ता बदलाच्या दृष्टीने काही घडते आहे कि काय ? अशी चर्चा सुरु झाली आहे.
त्याचे असे झाले कि , शिवसंग्राम संघटनेच्या वतीने मुंबईच्या शिवाजी पार्क येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर , आशिष शेलार यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना दरेकर आणि रामदास आठवले यांनी ठाकरे सरकार विषयी नवी भविष्यवाणी केली. विशेष म्हणजे या विधानात राज्यपालांनीही त्यांच्या वक्तव्याला पूरक ठरावे असे विधान केल्यामुळे या सर्वांच्याच विधानांची चर्चा होत आहे.
काय म्हणाले राज्यपाल ?
या कार्यक्रमात भाषण करताना राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले कि , “राजकारणात जो आपला विरोध करतो तो उद्या आपल्या सोबतही असेल.” त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.ते पुढे म्हणाले कि , “समाजात अनेक वाईट गोष्टी आहेत. त्याविरोधात संग्राम करावा लागेल. संग्राम प्रेमानेही करता येतो. छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे आहेत असे नाही. अन्य राज्यातही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे माहीत आहे. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे शक्ती कमी नव्हती पण शिवाजी महाराज यांच्याकडे शक्ती, भक्ती बरोबर युक्तीही होती”.
आठवले – दरेकर काय म्हणाले?
दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एप्रिलमध्ये चिंता दूर होणार असल्याचे विधान केले तर त्यांच्याच विधानाचा धागा पकडत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत “एप्रिलमध्ये काहीतरी नवीन घडेल असे प्रविण दरेकर, चंद्रकांतदादा म्हणतात, तर ” शिवाजी महाराज आहे आमचा लाडका राजा, वाजवून टाकू ठाकरे सरकारचा बाजा”, अशा शब्दांत या विषयावर भाष्य केले.