MumbaiNewsUpdate : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी होते. ते दीर्घकाळापासून आजारी होते. त्यातूनच आज मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. सुधीर जोशी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ते नुकतेच कोरोनाच्या आजारातून बरे होऊन घरी परतले होते.त्यांनी आजारपणामुळे १९९९ मध्ये सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती.
सुधीर जोशी यांनी शिवसेना पक्ष संघटनेत महत्वाची भूमिका बजावली. शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी बाळासाहेबांसोबत उल्लेखनीय काम केले. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत काम करत असलेले सुधीर जोशी १९७३ मध्ये मुंबईचे महापौर झाले होते. त्यांनी पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री ही पदेही त्यांनी भूषवली आहेत. सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा बाळासाहेबांनी सोपविली होती.
सुधीर जोशी उत्तम संघटक, अभ्यासू नेते : राज्यपाल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी मंत्री तसेच मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सुधीर जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. जोशी उत्तम संघटक तसेच अभ्यासू व लढवय्ये नेते होते. कामगार तसेच स्थानिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. मुंबईचे महापौर, विधान परिषद सदस्य, विरोधी पक्षनेते व राज्याचे मंत्री या नात्याने त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबिय व चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.
अनमोल हिरा गमावला – संजय राऊत
शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमांत ते मार्गदर्शन करायचे. महापौर कसा असावा, हे सुधीर जोशींकडून आम्ही शिकलो. त्यांनी शिवसेनेचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी लोकाधिकार समितीचं काम सुरू केलं. अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळण्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं. सुधीर जोशींनी अनेक आंदोलनांचं नेतृत्व केलं. प्रत्येक आंदोलनात ते आघाडीवर होते. उत्तम वक्ते, मितभाषी होते. एक शिवसैनिक म्हणून त्यांचा रुद्रावतार आम्ही पाहिलेला आहे. महसूल मंत्री, शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. दुर्दैवाने त्यांना एक अपघात झाला. त्यांचं शिवसेनेशी कायम नातं राहिलं. शिवसेनेनं सुधीर जोशींच्या रुपात एक अनमोल हिरा गमावला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.