MumbaiNewsUpdate : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते वयाच्या 69 व्या वर्षांचे होते. बप्पी लहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला.
रुग्णालयाचे संचालक डॉ दीपक नामजोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार , बप्पी लहिरी यांच्यावर गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. महिन्याभरापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . त्यानंतर सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर कुटुंबीयांनी डॉक्टरांना घरीच बोलावण्यासाठी फोन केला होता. नंतर त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे मंगळवारी रात्री त्यांचं निधन झाले .
Singer-composer Bappi Lahiri dies in Mumbai hospital, says doctor
— Press Trust of India (@PTI_News) February 16, 2022
बप्पी लहिरी यांनाही एप्रिल 2021 मध्ये कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. ते अखेरचे बिग बॉस 15 मध्ये सलमान खानसोबत दिसले होते. शोमधील एका गाण्याच्या प्रमोशनसाठी ते आपल्या नातवासोबत आले होते. बप्पी लहिरी यांनीही राजकारणात एन्ट्री घेतली होती. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 च्या सार्वजनिक निवडणुकीत त्यांना पश्चिम बंगालच्या श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. 1980 च्या दशकात आपल्या संगीत आणि गाण्यांद्वारे लोकांची मने जिंकणाऱ्या बप्पी लहिरी यांनी डिस्को डान्सर, शराबी आणि नमक हलाल यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये गाणी गायली.