MaharashtraNewsUpdate : काँग्रेसचे मोदीजी माफी आंदोलन तूर्त स्थगित …

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या जनतेचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे. याचाच भाग म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थान बाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून हे आंदोलन थांबवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नाना पटोले यांनी याबाबत बोलताना म्हटले की संस्कृती आणि संस्काराचे दाखले देत यांना राजकारण करावे लागते , ते आम्ही करत नाही. पंतप्रधाननांच्या खुर्चीवर बसून मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. राज्याचा अपमान सहन केला जाणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा नाना पटोले यांनी केली होती. तर याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपने दिला होता. सागर’ बंगल्यावर मोर्चा नेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. काँग्रेसच्या आंदोलनापूर्वी फडणवीसांच्या बंगल्याबाहेर पोहोचलेल्या भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. तर काही काँग्रेस कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले.
दरम्यान आंदोलनकर्त्या नाना पटोले यांनाही पोलिसांनी त्यांच्या घराबाहेरच थांबवले. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड बाहेर जाण्याचा साधा प्रयत्नही आंदोलकांनी केला नाही आणि काही वेळातच नानांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले . नाना पटोले यांच्या निवासस्थानी मरिन ड्राईव्ह पोलिसांचा ताफा तैनात होता. नाना पटोले यांना ताब्यात घेण्यासाठी गाडीही तैनात होती. पण पोलिसांना फार प्रयत्न करावे लागले नाहीत.
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सागर निवासस्थानी भाजपा नेत्यांसोबत बैठक घेतली. यावेळी फडणवीस सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानून , तुमची ताकद एवढी आहे की हे निदर्शन पण करू शकत नाहीत.काँग्रेसने खरे तर देशाची माफी मागायला पाहिजे कारण यांनीच कोरोना पसरवला, असा आरोप केला.