IndiaNewsUpdate : हिजाब घालून कॉलेजमध्ये येण्यास प्राचार्यांचा मज्जाव !!

Viral Video
बंगळुरू: कर्नाटकातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हिजाब परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी दिली जात नाही. या वर्षातील राज्यातील ही दुसरी घटना आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर या किनारी शहरामध्ये प्री-विद्यापीठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी हिजाब घालून वर्गात जाण्याची प्राचार्याकडे विनवणी करताना दिसतात. मात्र त्यांना गेटच्या बाहेरच ठेवले जात आहे. आमच्या परीक्षेला अद्याप दोन महिने बाकी आहेत आणि कॉलेजने हिजाबचं मुद्दा उपस्थित केल्याने महाविद्यालय प्रशासनाविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आतापर्यंत, राज्यातील नियम असा होता की विद्यार्थ्यांना महाविद्यालयात हिजाब घालण्याची परवानगी होती, परंतु त्यांना तो वर्गाच्या आत काढावा लागत होता. याबाबत पत्रकारांशी बोलताना उडुपी जिल्ह्याचे पालकमंत्री एस अंगारा म्हणाले की, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आहे ती स्थिती कायम ठेवली पाहिजे. मी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करेन. प्रत्येक कॉलेजसाठी स्वतंत्र नियम तयार करणे अवघड आहे, परंतु त्याबाबत शासन निर्णय घेईल, याबाबत मी संबंधितांसोबत बैठक बोलावली आहे.
बुधवारी या प्रकरणाला सुरुवात झाली जेव्हा काही मुली हिजाब घालून कॉलेजमध्ये पोहोचल्या, तेव्हाच 100 मुले भगवी शाल घालून तेथे पोहोचले. या प्रकरणी कॉलेज प्रशासनाने कुंदापूरचे आमदार हळदी श्रीनिवास शेट्टी यांच्यासोबत बैठक घेतली आणि विद्यार्थ्यांना असाच नियम पाळावा लागेल, असा निर्णय घेतला. मात्र, आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश रोखण्यात आला.
गेल्या दोन महिन्यांतील कर्नाटकातील ही दुसरी घटना आहे. पहिली घटना एका महिन्यापूर्वी उडुपी येथील पीयू गर्ल्स कॉलेजमध्ये घडली, जेथे अजूनही विद्यार्थिनी हिजाब घालून वर्गात बसण्याची परवानगी मिळविण्यासाठी धडपडत आहेत. एका विद्यार्थिनीने त्यांना वर्गात हिजाब किंवा हेडस्कार्फ घालण्याचा अधिकार मिळावा अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.