CoronaMaharashtraUpdate : राज्यात निर्बंधांना प्रारंभ , आता जीम आणि ब्युटी पार्लरही ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेसाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली असून घोषित करण्यात आलेले कडक निर्बंध रात्री बारावाजेपासून राज्यभरात जारी झाले आहेत. शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राज्य सरकारकडून हे निर्बंध जारी करण्यात आले होते. या नियमावलीमध्ये सलूनसाठी ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. पण ब्यूटी पार्लर आणि जीम यांना पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. याबाबत राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने सलूनसारखंच ब्यूटी पार्लर आणि जीमला देखील ५० टक्के क्षमतेने अटी-शर्तींच्या अधीन राहून सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.
राज्य सरकारकडून सलूनसाठी जी नियमावली जारी करण्यात आली आहे तीच नियमावली ब्यूटी पार्लरसाठी देखील असेल. ब्यूटी पार्लरमध्ये देखील ५० टक्केच ग्राहकांना परवानगी मिळेल. याशिवाय मास्क व्यतिरिक्त ज्या सेवा ब्युटी पार्लरमध्ये घेता येत होत्या त्या आता पुढच्या आदेशापर्यंत घेता येणार नाही. ब्यूटी पार्लरला गेल्यानंतर तोंडावरुन एक सेकंदसुद्धा मास्क हटवता कामा नये. याशिवाय ब्यूटी पार्लरला जाणाऱ्या ग्राहकाचे दोन्ही लसीचे डोस घेतलेले असावेत. तसेच ब्यूटी पार्लरचालकाने देखील दोन्ही लसीचे डोस घेतलेले असावेत.
दरम्यान राज्यातील जीम बंदचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयावरही परत विचार करण्यात आला आहे. राज्यातील जीम ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण जीममध्ये कोणताही व्यायाम करताना तोंडावरुन मास्क निघता कामा नये, असे सरकारकडून बजावण्यात आले आहे. तसेच जीममध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांसह व्यायामासाठी येणाऱ्या ग्राहकांनी दोन्ही लसीचे डोस घेतलेले असणं बंधनकारक असेल.