IndiaNewsUpdate : ओमायक्रॉनला रोखण्यासाठी ‘या’ गावात लागला १० दिवसांचा लोकडाऊन

हैदराबाद: आखाती देशातून गावात आलेली एक व्यक्ती ओमायक्रॉन बाधित आढळल्यानंतर लगेचच संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे. तेलंगणमध्ये हा प्रकार घडला आहे. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी सर्व सहमतीने गावात दहा दिवस लॉकडाऊन लावण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येईल अशी शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने ही भीती आणखीच वाढत चालली आहे. अशावेळी तिसरी लाट आलीच तर सरकार कठोर पावले उचलून लॉकडाऊन लावेल असेही बोलले जात आहे. असे असताना तेलंगणमधील रंजना सिरसिला जिल्ह्यातील गुडेम या गावाने मात्र कोणत्याही प्रशासनाच्या आदेशांची वाट न पाहता गावात लॉकडाऊन लावून टाकले आहे. आखाती देशातून एक व्यक्ती गावात परतली होती. तो कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याचे नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आला असता त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तातडीने त्याला हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व घडामोडींनंतर गावाने खबरदारी म्हणून थेट लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला.
गुडेम गावात दहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. गावातील व्यक्ती ओमायक्रॉन बाधित आढळल्यानंतर तातडीने ग्रामपंचायतीची बैठक झाली. त्यात एकमताने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. ओमिक्रॉनचा फैलाव अधिक वेगाने होत असल्याचे अहवाल आले आहेत. ही बाब ध्यान्यात घेत ओमायक्रॉनचा संसर्ग होण्यापासून गावकऱ्यांचा बचाव करण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले. गावात आवश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व व्यवहार पुढील दहा दिवस बंद राहणार आहेत.
दरम्यान आखाती देशातून गावात आलेल्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आवश्यकती सर्व पावले उचलण्यात येत आहेत. त्याचे कुटुंबीय व संपर्कातील व्यक्ती अशा ६४ जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याचे अहवाल अजून आलेले नाहीत. संबंधित ओमायक्रॉन बाधित व्यक्ती हैदराबाद येथील टिममध्ये दाखल असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.