CoronaIndiaUpdate : जगाचा सामना आता ‘डेल्मिक्रॉन’शी !! जाणून घ्या कोणाला होते बाधा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची…

नवी दिल्ली : देशात आणि जगभरात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट मुळे दहशत निर्माण झालेली असतानाच आता ‘डेल्मिक्रॉन’चे रुग्ण आढळून येत असल्याने चिंता आणखी वाढली आहे. ‘डेल्मिक्रॉन म्हणजे डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंट या दोन्हीही विषाणूंची बाधा होणे. भारतामध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे ३५४ रुग्ण आढळून आले असून पुढे डेल्टा व्हेरिएंटचे रुग्णही वाढतील असे सांगण्यात येत आहे. मात्र याचा सार्वधिक फटका युरोपीयन देश आणि पाश्चिमात्य देशांना बसेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ताज्या वृत्तानुसार रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांबरोबरच, वयस्कर व्यक्ती, गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. कमी लसीकरण झालेल्या भागांमध्ये हे दोन्ही व्हेरिएंट फार वेगाने प्रादुर्भाव करु शकतात. मात्र दोन्ही व्हेरिएंट एकत्र येऊन एक सुपर स्ट्रेन तयार करतात की नाही यावरुन तज्ज्ञांमध्येच मतमतांतरे आहेत. काही संशोधकांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार अशाप्रकारे एकाच वेळी दोन व्हेरिएंट सक्रीय असले तरी ते एकत्र येऊन नवीन व्हेरिएंट निर्माण होण्याची शक्यता दुर्मिळ आहे. मात्र ही शक्यता पूर्णपणे फेटाळताही येणार नाही.
दरम्यान भारतामध्ये ओमायक्रॉनचे ३५४ रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्राच्या कोव्हिड-१९ टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सध्या डेल्टा डेरिवेटिव्स, डेल्टा प्रकारातील विषाणूचा भारतामध्ये प्रादुर्भाव होत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये आता डेल्टापेक्षा अधिक वेगाने ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होतो आहे मात्र भविष्यात डेल्टा डेरिवेटिव्ह आणि ओमायक्रॉन विषाणू कशापद्धतीने परिणाम करतील हे आताच सांगता येणार नाही किंवा त्याचा अंदाजही बांधता येणार नाही.”
विशेष म्हणजे जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, दिल्लीमधील सर्वेक्षणानुसार सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ९० टक्के लोकांना कोरोनाची बाधा होऊन गेली आहे. तसेच ८८ टक्के लोकसंख्येने कोरोना लसीचा किमान एक डोस तरी घेतलेला आहे. या उलट डेल्मिक्रॉन या डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या एकत्र संसर्गामुळे युरोप आणि अमेरिकेतील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पहिल्यांदा नोव्हेंबर महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आलेल्या ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव तब्बल ८९ देशांमध्ये झाला आहे.