म्हाडा पेपर फुटी प्रकरण : अटकसत्र चालूच , एका विद्यार्थ्यांकडून उकळले जायचे १२ ते १३ लाख

पुणे : आरोग्य विभागाचा पेपर फुटल्यानंतर म्हाडाच्या भरती घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला. म्हाडा पेपर प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना तर आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणात आत्तापर्यंत १९ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी ‘घरातील वस्तू कधी मिळणार? ‘ असा कोडवर्ड वापरात होते. याचा अर्थ आहे फुटलेला पेपर कधी मिळणार… असा त्याचा अर्थ असल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.
म्हाडाच्या रविवारी होणाऱ्या रद्द झालेल्या परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख (वय ३२, रा. खराळवाडी, पिंपरी-चिंचवड), अंकुश रामभाऊ हरकळ (वय ४४, रा. किनगावराजा, सिंदखेडराजा, बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (वय ४२, रा. औरंगाबाद) यांना अटक केली. दरम्यान, सायबर पोलिसांकडून याबाबत तपास सुरु आहे. या तपासात महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. पहाटे दोन वाजता उमेदवारांचे फोन अंकुश आणि संतोष हरकळ या यांच्या संपर्कात अनेक उमेदवार होते. विशेषतः शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांना अनेक उमेदवारांचे फोन आले होते. पोलिसांनी त्यांना उमेदवारांशी बोलण्यास सांगितले तेव्हा अनेक उमेदवार हे ‘घरातील वस्तूचे काय झाले ? असा प्रश्न त्यांना विचारत होते. उमेदवार नेमक काय विचारताहेत, ते ऐकून पोलीसही चक्रावले होते. याबाबत त्यांनी जेव्हा आरोपींकडे विचारणा केली. तेव्हा, ते वाक्य कोडवर्ड असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली.
दरम्यान म्हाडा पेपर रद्द प्रकरणात आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली असून आणखी तीन जणांना अटक करण्यात येणार आहे. सर्वांच्या घराची झाडाझडती घेतली आहे. या तपासात आणखीन काही पेन ड्राईव्ह सापडले आहेत. प्राथमिक तपासात एका विद्यार्थ्यांकडून १२ ते १३ लाख घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या रक्कम ठरली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात आणखीन काही माहिती समोर आली असून त्यानुसार तपास सुरु सांगण्यात येत आहे.