AurangabadCrimeUpdate : औषध विचारण्याच्या बहाण्याने डॉक्टरच्या पोटात सुरा खुपसला !!

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सिडकोच्या कॅनॉट भागात कर्करोग रुग्णालयातील डॉक्टरवर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या प्रकरणात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय कर्करोग रुग्णालयातील डॉक्टर अब्दुल राफे हे सिडकोच्या कॅनॉट भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहतात. ते मंगळवारी रात्री रुग्णालयातून घरी आले. यावेळी एक व्यक्ती पोट दुखण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी आली. डॉक्टरांकडून चिठ्ठीवर औषधं लिहून घेतली. यानंतर ती व्यक्ती औषधं दाखविण्यासाठी डॉक्टरांच्या घरात आला. यावेळी डॉक्टर त्याला औषधं कशी घ्यायची याबद्दल सांगत असताना त्याने त्यांच्या पोटात चाकू खुपसला.
दरम्यान चाकू हल्ला झाल्यानंतर डॉक्टरांच्या पोटातून मोठा रक्तस्त्राव होत होता. हल्लेखोर पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडले. यावेळी त्याने माझ्या बहिणीला मारले असे म्हणत तेथून पळ काढला. मात्र या आरोपीची दुचाकी अपार्टमेंटच्या खालीच राहिली. या घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत डॉ. राफे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुचाकी कर्नाटकातील गुलबर्गा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.