OmicronIndiaUpdate : ओमिक्रॉनबाबत केंद्र सरकारने राज्यांना दिल्या महत्वपूर्ण सूचना , निष्काळजीपणा करू नका…

नवी दिल्ली : बहुचर्चित ओमिक्रॉनबाबत केंद्र सरकार गंभीर असून राज्य सरकारांनी देशात येणाऱ्या प्रवाशांवर कडक नजर ठेवून सर्वांची चाचणी करावी तसेच त्यांच्या चाचणीचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणालाही बाहेर जाण्यास परवानगी देण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. SARS-CoV-2 चा आणि कोरोनाचा ओमिक्रॉन वेरियंट RT-PCR आणि RAT चाचणीमधून निसटू शकत नाही. यामुळे राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी रुग्णांना लवकरात लवकर शोधण्यासाठी चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी. तसेच हॉटस्पॉटमध्ये नियमांचे कठोर पालन करावे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसोबत आज उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधील तयारीचा आढावा घेतला. दरम्यान विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यावर केंद्रीय आरोग्य सचिवांनी बैठकीत भर दिला. राज्यांनी कुठल्याही स्थिती हलगर्जीपणा किंवा ढिसाळपणा येऊ देऊ नये. देशातील विविध विमानतळांवर उतरणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर अतिशय कडक नजर ठेवावी. आंतरराष्ट्रीय विमानतळे, बंदरं आणि सीमांवरही अतिशय कडक पाहारा ठेवावा, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज राज्यसभेत माहिती देताना सांगितले कि , देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही. ओमिक्रॉनचा प्रवेश देशात होऊ नये यासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहे, असे मांडवीय यांनी सांगितले. आतापर्यंत १४ देशांमध्ये ओमिक्रॉन वेरियंट आढळून आला आहे. या वेरियंट संदर्भात अभ्यास सुरू आहे. पण देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही.
दरम्यान आरोग्य सचिवांनी पुढे सांगितले कि , आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर अतिशय बारकाराईन लक्ष ठेवा. कुठलाही निष्काळजीपणा करू नका. ओमिक्रॉनचा संसर्ग असलेल्या म्हणजे हाय रिस्क देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी तातडी करावी आणि त्यांच्यासंबंधी दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे. हाय रिस्क देशांमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा आरटी-पीसीआर रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्यांना विमानतळावरच रहावं लागेल, असे केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना सांगितले.
चाचणीत पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या सर्व नमुने हे INSACOG प्रयोगशाळेत वेळेवर पाठवावेत. तसेच राज्यांनी अशा रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचीही चाचणी करावी. १४ दिवस त्याचा पाठपुरावा करावा, असे केंद्राने राज्यांना म्हटले आहे. ओमिक्रॉन वेरियंट आरटी-पीसीआर आणि आरएटी चाचणीतून निसटू शकत नाही. यामुळे राज्यांनी केंद्र शासित प्रदेशांनी या चाचण्यांवर भर द्यावा. लवकर रुग्ण शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या करणे गरजेचे आहे, असे आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले.