IndiaPoliticalUpdate : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक

नवी दिल्ली : संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस पक्ष नेत्यांची एक बैठक बोलावण्यात आली असल्याचे वृत्त आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असून या बैठकीत पक्षाचे वरीष्ठ नेतेही सहभागी होत आहेत. येत्या सोमवारपासून म्हणजे, २९ नोव्हेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
हिवाळी अधिवेशनातील देशातील विविध प्रश्नांच्या मुद्द्यावर पक्षाची रणनीती काय असेल ? अधिवेशनादरम्यान कुठला मुद्दा कधी उचलायचा ? या सर्व विषयावर बैठकीत चर्चा होईल असे सांगण्यात येत आहे. अधिकाधिक मुद्दे संसदेच्या दोन्हीही सभागृहात प्रभावीपणे उपस्थित करणे आणि सरकारला त्यावर उत्तर देण्यासाठी भाग पाडणं या विषयावरही बैठकीत मंथन होणार आहे.
दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यामुळे संसदेच्या दोन्हीही सभागृहात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच २८ नोव्हेंबर रोजी एक सर्वपक्षीय बैठकही बोलावण्यात आलीय. याशिवाय राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी २८ नोव्हेंबर रोजी पक्षाच्या नेत्यांची एक बैठकही बोलावली आहे. या बैठकीत सदनाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासंबंधी तसंच कामकाजासंबंधी चर्चा केली जाईल. तसेच संसदेत अधिकाधिक विधेयके संमत केली जावीत, यावर सत्ताधाऱ्यांचा जोर असेल.